अहिल्यानगर : वृत्तसंस्था
भारतीय टी-२० क्रिकेट संघाचा कर्णधार तथा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव बुधवारी सपत्निक शिर्डीत येत साई बाबांच्या चरणी नतमस्तक झाला. तसेच दर्शनानंतर त्याने माध्यमांशी संवादही साधला.
भारतीय क्रिकेट संघाचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादवने पत्नी देवीशा शेट्टी समवेत बुधवारी माध्यन्ह आरतीनंतर शिर्डीत साईंच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. दर्शनानंतर साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सूर्यकुमार यादवचा सत्कारही केला. याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी आदी मान्यवर उपस्थित होते.
साईबाबांच्या दर्शनानंतर सूर्यकुमारने प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्याने सांगितले की, आजपर्यंत साईबाबांनी दिलेल्या यशाबद्दल आज बाबांना धन्यवाद देण्यासाठी शिर्डीला आलो असून यापुढेही अशीच मेहनत करण्याची शक्ती देवोत अशी प्रार्थना साईबाबांकडे केली आहे. याव्यतिरिक्त बाबांकडे जे मागितले ते तुम्हाला सांगणार नाही असेही सूर्यकुमारने सांगितले.