21.2 C
Latur
Thursday, October 24, 2024
Homeमहाराष्ट्रसंभाजी ब्रिगेड-जरांगे अंडरस्टॅँडिंग ठेवून उमेदवार देण्याविषयी सहमत

संभाजी ब्रिगेड-जरांगे अंडरस्टॅँडिंग ठेवून उमेदवार देण्याविषयी सहमत

अंतरवाली सराटी : विशेष प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून अंतरवली सराटीला अधिक महत्त्व आलं आहे. सर्वच राजकीय पक्षाचे इच्छुक उमेदवार, माजी आमदार आणि विद्यमान आमदारांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यास सुरुवात केली आहे. कोणी मध्यरात्री गुपचूप भेटायला येत आहे, तर कोणी पहाटे भेटायला येत आहे. संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांनीही जरांगे यांची भेट घेतली.

या भेटीविषयी माजी मंत्री बदामराव पंडित यांनी मीडियाशी संवाद साधताना माहिती दिली. संभाजी ब्रिगेड हे एक संघटन आणि राजकीय पक्ष आहे. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश व्हावा तसेच ओबीसींचे संरक्षण व्हावे हे मुद्दे घेऊन संभाजी ब्रिगेड गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहे. तीच भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे, अशी माहिती बदामराव पंडित यांनी दिली.

जरांगे पाटील आणि आमचा समन्वय चांगला आहे. मात्र या लोकशाहीच्या महोत्सवात आम्ही स्वतंत्र सामील होणार आहोत, असे संभाजी ब्रिगेडने आधीच जाहीर केले आहे. मनोज जरांगे यांनीही तसंच जाहीर केलं आहे. पण उमेदवार दिल्याशिवाय पर्याय नाही. जी भूमिका जरांगे पाटलांची आहे, तीच भूमिका आमची आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

विधानसभेत समाजाचे प्रश्न मांडणारे लोक गेले पाहिजेत. योग्य उमेदवार देण्याबाबत आम्ही सविस्तर चर्चा करणार आहोत. जरांगे पाटील यांच्याकडेही आणि आमच्याकडेही उमेदवार येतात. परंतु आम्ही अंडरस्टॅँडिंग ठेवून ठरवून उमेदवार देणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.

आपला झेंडा, आपला अजेंडा हवा
विधानसभेत आपली माणसं पाठवायची असतील आणि आपले प्रश्न मार्गी लावायचे असतील तर समविचारी लोकांशी चर्चा करून राजकीय भूमिका घेतली पाहिजे. आपला झेंडा, आपला अजेंडा ही भूमिका पाहिजे. याबाबत पुढे निर्णय होईल आणि त्या अनुषंगाने पुढे वाटचाल चालू होईल, अशी माहितीही बदामराव पंडित यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR