कोल्हापूर : लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी जागावाटपावरून सर्वच पक्षांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. यादरम्यान कोल्हापूर मतदारसंघाच्या जागेवरून महाविकास आघाडीत अजून चर्चा सुरू आहे. यादरम्यान संभाजीराजेंना मविआमधील तीनपैकी एका पक्षात प्रवेश केल्यास लोकसभेची उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान आता खुद्द संभाजीराजेंनी या ऑफरवर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
दरम्यान, संभाजीराजे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत त्यांची भूमिका मांडली. ‘स्वराज्य’ पक्ष असताना इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही. राज्यातील जनतेच्या विश्वासावर महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचे भविष्य हे स्वराज्य असेल या ध्येयाने माझी व स्वराज्य पक्ष संघटनेची वाटचाल सुरूच राहणार आहे, असे संभाजीराजे म्हणाले आहेत.
महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांची शिवसेना, राष्ट्रवादीचा शरद पवार गट किंवा काँग्रेस या पक्षांपैकी एकात सामील होऊन संभाजीराजे लढले तरच त्यांना उमेदवारी देण्यात येईल, अशी भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये याबद्दल एकमत झाले होते.