बँकॉक : गेल्या वर्षी थायलंडमध्ये समलैंगिक विवाह कायदेशीर झाल्यानंतर, आता तो देशभरात लागू करण्यात आला आहे. हा कायदा करणारा थायलंड आग्नेय आशियातील पहिला देश बनला. गुरुवारी थायलंडमध्ये मोठ्या संख्येने समलिंगी जोडप्यांनी सामूहिक विवाहात भाग घेतला.
लग्नाला कायदेशीर मान्यता मिळाल्यानंतर समलिंगी जोडप्यांनी आनंद व्यक्त केला आहे. गुरुवारी थायलंडमधील लोकांनी हा आनंद साजरा केला. समलिंगी विवाह कायद्याची मागणी करणा-या कार्यकर्त्यांनी याला एक मोठा विजय म्हटले. थायलंडमधील एलजीबीटीक्यू प्लस समुदाय गेल्या अनेक दशकांपासून समलिंगी विवाहांची मागणी करत आहे. हे विधेयक थाई संसदेने मंजूर केले होते आणि या वर्षी राजानेही ते मंजूर केले. या कायद्यानुसार, समलैंगिक जोडप्यांना आर्थिक, कायदेशीर आणि वैद्यकीय हक्क आहेत. ते आता मूळ दत्तक घेण्यालाही सक्षम आहेत.
थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये सामूहिक समलैंगिक विवाहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान पतोंगटार्न शिनावात्रा यांनीही एक संदेश जारी केला. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, हा विवाह कायदा म्हणजे लिंग विविधतेबाबत थाई समाजात व्यापक जागरूकतेची सुरुवात आहे. जात आणि धर्माची पर्वा न करता सर्वांना सामावून घेण्याचा हा आमचा उपक्रम आहे. सर्वांना समान हक्क आणि आदर मिळायला हवा, असेही ते म्हणाले.
३० पेक्षा जास्त देशांमध्ये मान्यताप्राप्त
प्यू रिसर्च सेंटरच्या मते, सध्या जगभरातील ३० हून अधिक देशांनी समलैंगिक विवाहाला मान्यता दिली आहे. पण आशियातील फक्त तीन देशांनी हे केले आहे. सर्वात आधी तैवानने २०१९ मध्ये आणि नंतर नेपाळने ते मान्य केले. आता थायलंड तिसरा देश बनला आहे.