मुंबई : मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे माजी झोनल संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. समीर वानखेडे हे ईडीच्या रडारवर आले आहेत. ईडीने वानखेडे यांच्याविरोधात मनी लाँड्रिंग कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय यंत्रणा लवकरच त्यांना चौकशीसाठी बोलावू शकते. सीबीआयने दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या एफआयआरच्या आधारे ईडीने आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढू शकतात.
२०२१ सालच्या ऑक्टोबर महिन्यात कॉर्डेलिया क्रूझवर ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त केल्यानंतर वानखेडे हे सीबीआयच्या निशाण्यावर आले होते. आणि तपासाच्या प्रकरणाला वेग आला होता. कथित ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड स्टार शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खानसह अन्य काही जणांना अटक करण्यात आली होती. मात्र कालांतराने त्याला क्लीन चिट देण्यात आली होती. या प्रकरणामुळे वानखेडे चर्चेत आले होते. आता ईडीने समीर वानखेडे यांच्याव्यतिरिक्त, नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या तीन अधिका-यांना पुढील आठवड्यातील चौकशीसाठी समन्स बजावले असून त्यात दक्षता अधीक्षक कपिल यांचाही समावेश आहे. या अधिका-यांची मुंबईतील कार्यालयात चौकशी केली जाणार आहे. याआधी ईडीने काही लोकांची चौकशीही केली आहे.
वानखेडे यांची उच्च न्यायालयात धाव
याचदरम्यान, समीर वानखेडे यांनी गुन्हा रद्द करण्यासाठी आणि संभाव्य अटकेच्या कारवाईविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. वानखेडे यांनी ईडीच्या कारवाईबाबत हायकोर्टात याचिका दाखल केली असून, ईडीची ही अचानक कारवाई म्हणजे २०२३ मध्ये नोंदवलेल्या सीबीआय एफआयआर आणि ईसीआयआरच्या आधारे सूडबुद्धी आणि द्वेषभावना आहे, असे म्हटले होते.