मुंबई : कॉर्डेलिया क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या समीर वानखेडे यांची चेन्नईला झालेली बदली कॅटने अर्थात केंद्रीय प्रशासकीय न्यायाधीकरणाने रद्द केली आहे. यावेळी वानखेडे यांच्याविषयीची भूमिका पक्षपातीपणाची असल्याची टीकाही कॅटने केली. कॅटचे अध्यक्ष न्या. रणजित मोरे आणि सदस्य-अ राजिंदर कश्यप यांच्या पीठाने हा निर्णय दिला आहे.
महसूल विभागाने समीर वानखेडे यांची मे २०२२ मध्ये मुंबईहून चेन्नईला बदली केली होती. महसूल विभागाचा हा आदेश मनमानीपणाचा आणि स्वत:च्या विभागाच्या बदलीच्या धोरणाचा उल्लंघन करणारा असल्याचे न्यायाधीकरणाने म्हटले आहे. बदलीपूर्वी वानखेडे मुंबईमध्ये एनसीबीचे विभागीय संचालक होते. त्यावेळी कॉर्डेलिया क्रूझवर रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी छापेमारी केली होती. या छाप्यात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अमली पदार्थ बाळगल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. त्यानंतर त्याच्या कुटुंबाकडून २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला होता.
यामुळे वानखेडे यांना या प्रकरणाच्या चौकशीतून हटविण्यात आले होते. त्यानंतर ३० मे २०२२ रोजी त्यांची चेन्नईला बदली करण्यात आली होती. पण आता हा बदली आदेश मनमानीपणाचा आणि स्वत:च्या विभागाच्या बदलीच्या धोरणाचा उल्लंघन करणारा असल्याचे न्यायाधीकरणाने म्हणत कॅट बदली रद्द केली आहे.