सांगली : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना त्यांच्या पक्षाच्या जिल्हाप्रमुखाकडून अनोखी भेट मिळाली आहे. सांगलीचे शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे यांनी एकनाथ शिंदे यांचा पुतळा सांगलीत उभारण्यात असल्याची घोषणा केली आहे.
महेंद्र चंडाळे यांनी सांगितले की, सामान्यत: नेत्यांचे पुतळे त्यांच्या निधनानंतर उभारले जातात. मात्र, जनतेच्या सेवेसाठी झटणा-या नेत्यांचा सन्मान त्यांच्याच हयातीत झाला पाहिजे. त्यामुळेच आम्ही एकनाथ शिंदे यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या या वाढदिवसाला पुतळा उभारण्याची घोषणा करताना त्यांच्या पुढच्या वाढदिवसाच्या आधी त्यांचा पुतळा उभारून तयार असेल असे देखील चंडाळे यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांचा पुतळा उभारण्याची घोषणा चंडाळे यांनी केली असली तरी या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. विरोधकांकडून पुतळा उभारण्याच्या निर्णयावर टीका होण्याची शक्यता आहे. मात्र, शिवसैनिकांनी मात्र पुतळा उभारण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.