नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, म्हणजेच आरबीआयला नवे गव्हर्नर मिळाले आहेत. मंत्रिमंडळ समितीने वित्तीय सेवा विभाग सचिव संजय मल्होत्रा यांची आरबीआयच्या गव्हर्नरपदी नियुक्ती केली आहे. विद्यमान गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा कार्यकाळ उद्या, १० डिसेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे संजय मल्होत्रा १२ डिसेंबर रोजी पदभार स्वीकारतील.
मिळालेल्या माहितीनुसार, रिझर्व्ह बँकेचे २६ वे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा कार्यकाळ ३ वर्षांचा असेल. विशेष म्हणजे, केंद्र सरकारने २०२२ मध्येच संजय मल्होत्रा यांना रिझर्व्ह बँकेचे संचालक म्हणून नियुक्त केले होते. आता त्यांच्याकडे आरबीआयच्या गव्हर्नरपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
कोण आहेत संजय मल्होत्रा?
संजय मल्होत्रा हे राजस्थान केडरचे १९९० च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. नोव्हेंबर २०२० मध्ये ते आरईसीचे अध्यक्ष आणि एमडी झाले होते. याआधी त्यांनी ऊर्जा मंत्रालयात अतिरिक्त सचिव पदावरही काम केले आहे. संजय मल्होत्रा यांनी आयआयटी कानपूरमधून अभियांत्रिकीची पदवी घेतली असून प्रिन्स्टन विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले आहे. गेल्या ३० वर्षांपासून मल्होत्रा यांनी ऊर्जा, वित्त, कर, आयटी आणि खाण यांसारख्या महत्वाच्या खात्यांमध्ये काम केले आहे.