नवी दिल्ली : काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी पक्षविरोधी वक्तव्य केल्यामुळे त्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे, असे काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी एक्स मीडियावर जाहीर केले. विशेष म्हणजे निरुपम यांनी आज (गुरुवारी) निर्णय जाहीर करणार असल्याचे म्हटले होते. त्यापूर्वीच काँग्रेसने निरुपम यांची हकालपट्टी करत कारवाई केली आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस वेणुगोपाल यांनी बुधवारी रात्री सोशल मीडियात पोस्ट केली आहे. त्यात म्हटले की, शिस्तभंग तसेच काँग्रेस पक्षविरोधी विधानांच्या तक्रारींची दखल घेऊन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी संजय निरुपम यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. संजय निरुपम यांचे नाव काँग्रेसच्या स्टार प्रचारकांमध्ये होते.
ते देखील काढून टाकण्यात आल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यापूर्वीच म्हटले आहे. तसेच नाना पटोले यांनी संजय निरुपम यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत काल दिले होते. त्यानंतर निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली.