अहिल्यानगर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात संजय राऊत यांनी केलेल्या वक्ताव्यावरून अहिल्यानगरला दिल्ली गेट येथे संजय राऊत यांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन करण्यात आले. तसेच संजय राऊत यांच्या तोंडाला काळे फासेल त्यास एक लाख रुपये बक्षीस यावेळी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख सचिन जाधव यांनी जाहीर केले आहे.
एकनाथ शिंदे हा कायम अस्वस्थ आत्मा आहे. त्याने खरे म्हणजे महाकुंभमेळ्यात जाऊन नागा साधू बरोबर जाऊन बसायला पाहिजे होते, नागा साधूही फार अस्वस्थ असतो असे वक्तव्य राऊत यांनी केले होते. या वक्तव्याचा निषेध करत अहिल्यानगर शहरात शिवसेनेच्या वतीने खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले. शहरातील दिल्लीगेट येथे शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. तर खासदार संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य चुकीचे असून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावण्याचे काम खासदार संजय राऊत यांनी केले आहे अशी प्रतिक्रिया यावेळी आंदोलकांनी दिली आहे.
मीडियाने त्यांना जिवंत ठेवले : निलेश राणे
दुसरीकडे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावरुन शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी सडकून टीका केली आहे. यावेळी ते म्हणाले की, संजय राऊत रोज फालतू स्टेटमेंट काढतात, त्यांची पत काय? असा प्रश्न आमदार निलेश राणे यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रासाठी त्यांच योगदान काय? त्याला मीडियाने जिवंत ठेवले आहे, अशा शब्दात आमदार निलेश राणे यांनी संजय राऊत यांना सुनावले. उदय सामंत शिंदे गटाचे २० आमदार घेऊन भाजपमध्ये जातील, या संजय राऊत यांच्या दाव्यावर बोलताना निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. आम्ही सर्व आमदार एकनाथ शिंदेसोबत आहोत, आमचा संसार निट चालला आहे असेही निलेश राणे म्हणालेत.
काय म्हणाले होते संजय राऊत?
महाराष्ट्रात पालकमंत्री पदावर दंगल सुरू आहे. रायगडच्या पालकमंत्री पदावरून रस्त्यावर घोषणा, टायर जाळले जात आहे. जे बहुमत राज्यात मिळाले आहे त्याचा हे अपमान करत आहेत. पालकमंत्री पदाबाबत घोषणा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उदय सामंत यांच्यासोबत परदेशात गेले आहेत. एकनाथ शिंदे यांची नाराजी खरी ही आहे. पालकमंत्री पद हे फक्त निमित्त आहे. पालकमंत्री पदासाठी एवढा हावरटपणा का करत आहेत? असा सवाल करत खासदार संजय राऊतांनी महायुतीवर टीका केली.