मुंबई, दि.२(प्रतिनिधी) बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला लढविण्यासंदर्भात आपली उज्जवल निकम यांच्याशी चर्चा झाली आहे. ते सध्या इतर खटल्यांत व्यस्त आहेत. त्यांनी जर होकार दिला तर या खटल्यासाठी त्यांची निवड करण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. भाजपा आ.सुरेश धस यांनी निकम यांची या प्रकरणी वकिल म्हणून नियुक्ती करण्याची मागणी केली होती.
उज्ज्वल निकम यांच्याकडे सध्या इतर प्रकरणे आहेत. त्या प्रकरणांतून वेळ कसा मिळेल याची आपण दोन दिवसांत माहिती घेउन कळवितो. निकम यांनी होकार दिला तर संतोष देशमुख हत्या प्रकरण देखील निकम यांच्याकडे सोपविण्यात येईल असे फडणवीस म्हणाले. कराड यांचे एन्काउंटर, त्यांना पोलीस ठाण्यात झोपायला पलंग या आरोपांबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पोलीस ठाण्यात पोलिसांची अतिरिक्त कुमक मागविण्यात आली आहे, त्यांना काय जमिनीवर झोपवणार का. त्यांच्यासाठीच हे पलंग होते. तसेच एन्काउंटर वगैरे लोक बोलतात हे केवळ प्रसिदधीसाठी सुरू आहे असा टोलाही त्यांनी लगावला.
मी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितलेला नाही – सुरेश धस
सुरेश धस यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना धस म्हणाले, मी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितलेला नाही. ज्या सरकारी वकिलांनी बाजू मांडण्यास नकार दिला त्यांचे अभियोक्तापद काढून घेण्यात यावे असे पत्र मी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले आहे. उज्जवल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणीही मी केली आहे. तसेच बीडमध्ये हे प्रकरण चालवू नये असे माझे म्हणणे नाही. पण बीडमध्ये हे आरोपी लॉकअपमध्ये ठेवू नयेत त्यांना हर्सुल किंवा नाशिकच्या जेलमध्ये हलवावे. बिंदुनामावलीचे बीड जिल्हयात वाटोळे झालेले आहे. सर्वच पदांवर एकाच प्रवर्गातील लोक बीडमध्ये आहेत. त्यामुळे जिल्हयात कुठल्याही बाबतीत अडचण होईल. भविष्यात केस देखील दुस-या जिल्हयात हलविण्याची पाळी येईल असेही धस म्हणाले.