29.1 C
Latur
Thursday, December 26, 2024
Homeमहाराष्ट्रसरवणकर लढणार, माहीममध्ये तिरंगी लढत, अमित ठाकरेंची वाट बिकट

सरवणकर लढणार, माहीममध्ये तिरंगी लढत, अमित ठाकरेंची वाट बिकट

मुंबई (प्रतिनिधी) : मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असून शिंदे गटाच्या सदा सरवणकर यांच्यावर उमेदवारी मागे घेण्यासाठी महायुतीतून दबाव होता; पण राज ठाकरे यांनी त्यांना भेटायलाही नकार देऊन काय करायचे ते करा, असा निरोप पाठवल्याने त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या मतदारसंघात आता तिरंगी लढत होणार असून पहिल्याच निवडणूकीत अमित ठाकरे यांना कडवी लढत द्यावी लागणार आहे.

राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपाने त्यांना पाठिंबा दिला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अमित ठाकरेंचा निर्णय होण्यापूर्वीच विद्यमान आमदार सदा सरवणकर यांची उमेदवारी जाहीर करून ए बी फॉर्म दिले होते. सरवणकर यांना कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याची सूचना शिंदे यांनी दिली होती त्यामुळे ते काय करणार याबद्दल कुतूहल होते.

आज अर्ज उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना सदा सरवणकर हे मनसेप्रमुख राज ठाकरे यांना भेटण्यासाठी शिवतीर्थ या निवासस्थानी गेले होते. सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर आणि काही पदाधिकारी शिवतीर्थ निवासस्थानी आतमध्ये गेले. त्यांनी राज ठाकरे यांच्याकडे जाऊन सदा सरवणकर यांना आपल्याला भेटायचे असल्याचे सांगितले मात्र, राज ठाकरे यांनी सदा सरवणकर यांना भेटण्यास नकार दिला. राज ठाकरे यांनी, मला काही बोलायचं नाही. तुम्हाला निवडणूक लढवायची तर लढवा, उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा तर मागे घ्या. मला यावर कोणतीही चर्चा करायची नाही, असे राज ठाकरे यांनी सांगितले. यामुळे आपण निवडणूक लढवणार असल्याचे सरवणकर यांनी सांगितले.

मी महायुतीचा उमेदवार म्हणून रिंगणात आहे. वैयक्तिक मैत्रीपोटी भाजपचे काही नेते अमित ठाकरे यांना पाठिंबा देत असतील; पण महायुतीचे कार्यकर्ते माझ्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वास सदा सरवणकर यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला राज ठाकरे यांची भेट घ्यायला सांगितली होती. आम्ही मदतीसाठी एक नव्हे तर दोन्ही हात पुढे केले होते. राज ठाकरे यांनी दिलेला आदेश आम्ही ऐकणार होतो. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही वागायचे ठरवले होते; पण त्यांनी भेटच नाकारली त्यामुळे लढायचे ठरवल्याचे त्यांनी सांगितले. सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने माहीम विधानसभा मतदारसंघात आता अमित ठाकरे, सदा सरवणकर आणि ठाकरे गटाचे नेते महेश सावंत अशी तिरंगी लढत होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR