22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeराष्ट्रीयपाचव्या टप्प्यात काँग्रेसची सरशी?

पाचव्या टप्प्यात काँग्रेसची सरशी?

उत्तर प्रदेशमध्ये भाजपला धक्का २०१९ च्या तुलनेत कमी जागा मिळण्याची शक्यता

लखनौ : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यांपैकी पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी (ता. २०) झाले. उत्तर प्रदेशमधील सत्ताधारी भाजपसाठी हा टप्पा  आश्चर्यकारक निकालाचा ठरू शकतो. राज्यात २०१९ मधील लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यात १४ मतदारसंघांमध्ये निवडणूक झाली होती. त्यातील १३ जागांवर विजय मिळवून भाजपला एकहाती यश मिळाले होते. पण यावेळी आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत भाजपसाठी फारशी अनुकूल स्थिती असल्याचे दिसत नाही.

दरम्यान, सध्याची लोकसभा निवडणूक मोठी चुरशीची होत आहे. काँग्रेस व भाजप या प्रमुख पक्षांत होणारी थेट लढत ही २०१९च्या तुलनेत सोपी नव्हती आणि पक्षाच्या नेत्यांसाठी ही बाब चिंतेची आहे. राज्यातील निवडणूक आखाड्यात उतरलेल्या ‘इंडिया’ आघाडीतील काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने (सप) भाजपला पाचव्या टप्प्यातील १४ पैकी १० जागांवर आव्हान दिले आहे. उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या एकूण ८० जागा आहेत. देशातील सर्वाधिक खासदार उत्तर प्रदेशातून निवडून येतात.

पाचव्या टप्प्यातील तीन लढती लक्षवेधी ठरल्या. यामध्ये रायबरेली प्रथम क्रमांकावर आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे भाजपचे दिनेश प्रताप सिंह यांच्याविरोधात रिंगणात आहेत. तर दुसरी सर्वाधिक चर्चेची लढत अमेठीतील आहे.

भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या मतदारसंघातून तिस-यांदा नशीब अजमावत आहेत. राहुल गांधी यांच्याविरोधात त्यांना भाजपने २०१४ मध्ये उभे केले होते. त्यामुळे संपूर्ण देशभरात त्यांचे नाव झाले होते. पण पहिल्यावेळी त्यांना राहुल गांधींकडून हार पत्करावी लागली होती. २०१९ च्या निवडणुकीत मात्र स्मृती इराणी यांनी राहुल यांचा पराभव केला आणि अमेठीतून गांधी घराण्याचा खासदार होण्याची परंपरा खंडित झाली. यावेळी राहुल गांधी यांनी अमेठीऐवजी आईचा पारंपरिक मतदाररसंघ रायबरेलीतून लढण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे स्मृती इराणी यांचा सामना काँग्रेसचे सामान्य नेते किशोरीलाल शर्मा यांच्याशी होता. दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळापासून शर्मा यांना या मतदारसंघाचा परिचय आहे. त्यांनी इराणी यांना चांगली लढत दिल्याचे वृत्त आहे.

तिसरी सर्वांत महत्त्वाची लढत लखनौची होती. तेथे संरक्षण मंत्री राजनाथसिंह रिंगणात उतरले आहेत. उत्तर प्रदेशातील राजधानीत त्यांनी केलेल्या विकासकामांमुळे मतदारांमध्ये राजनाथसिंह यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण होते.

राहुल गांधींची लोकप्रियता वाढली
राहुल गांधी यांच्यात झालेले परिवर्तन हे ‘इंडिया’ आघाडीला बळ देणारे ठरत आहे. यावेळच्या निवडणुकीची जबाबदारी त्यांनी स्वत:च्या खांद्यावर पेलली असून त्यांच्यातील हा बदल सर्वांसाठी आश्­चर्यकारक ठरला आहे. नागरिकांशी निगडित मुद्दे प्रचारात आणून राहुल गांधी यांनी लोकप्रिय आणि शक्तिशाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मागे टाकले असून आक्रमक आणि अर्थपूर्ण भाषणांनी उत्तर प्रदेशातील तरुणांना आकर्षित केले आहे. केरळमधील वायनाड व्यतिरिक्त रायबरेलीतून निवडणूक लढविण्याच्या त्यांच्या निर्णयाने राज्यात सुप्तावस्थेत असलेली काँग्रेस सक्रिय झाली आहे.

युवकांचा वाढता प्रतिसाद
उत्तर प्रदेशात काँग्रेस ८० पैकी केवळ १७ जागा लढवीत आहे. मात्र ‘इंडिया’ आघाडीतील समाजवादी पक्षासाठी त्यांनी प्रचाराचा धुरळा उडविला. राज्यातील कानाकोप-यात, तळागाळात ‘सप’ची मुळे पोहोचलेली आहेत. राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या नुकत्याच झालेल्या सभांना मिळणारा प्रतिसाद वा-याचा रोख दाखवून देणारा आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या काळात सरकारी नोकरभरतीच्या परीक्षांचे पेपर फुटणे आणि त्यामुळे परीक्षा रद्द करण्याच्या घटनांनी राज्यातील तरुणांमध्ये संतप्त भावना आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR