नवी दिल्ली : केंद्र सरकारने आज (गुरुवारी) स्वच्छ सर्वेक्षण २०२३ चा निकाल जाहीर केला. यामध्ये एक लाखाहून कमी लोकसंख्या असलेले पुणे जिल्ह्यातील सासवड शहर देशातले सर्वात स्वच्छ शहर म्हणून निवडले गेले. तर एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये इंदूर सातव्यांदा पहिल्या क्रमांकावर आहे आणि महाराष्ट्राची नवी मुंबई तिस-या क्रमांकावर आहे.
भोपाळ सहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोहोचले आहे. तर एका लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये महाराष्ट्रातील सासवड प्रथम आहे, छत्तीसगडचे पाटण द्वितीय आणि महाराष्ट्रातीलच लोणावळा तृतीय क्रमांकावर आहे. यावेळी देशातील स्वच्छ राज्यांच्या श्रेणीत महाराष्ट्राला प्रथम, मध्य प्रदेशने द्वितीय तर छत्तीसगडला तृतीय क्रमांक मिळाला आहे. गेल्या वेळी मध्य प्रदेश पहिल्या क्रमांकावर होता.
गंगेच्या काठावर वसलेल्या स्वच्छ शहरांमध्ये वाराणसी पहिल्या तर प्रयागराज दुस-या क्रमांकावर आहे. दिल्लीतील भारत मंडपम कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीप पुरी यांनी या राज्यांच्या प्रतिनिधींचा गौरव केला.
यावेळी एकूण ९५०० गुणांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. मध्य प्रदेशातील महूला सर्वात स्वच्छ कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट सफाई मित्र सुरक्षित शहर पुरस्कार चंदीगडला देण्यात आला आहे.