सातारा : प्रतिनिधी
महायुती सरकारमध्ये पुढील पाच वर्षे फक्त आणि फक्त सातारा जिल्ह्याचा दबदबा असणार आहे. सातारा जिल्ह्यातून आठपैकी तब्बल चार आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळाली होती. त्यामुळे खातेवाटपामध्ये कोण बाजी मारणार याची चर्चा रंगली होती. मात्र तिन्ही पक्षांकडून साता-यातील चारही मंत्र्यांना वजनदार खाती देण्यात आल्याने सातारा जिल्ह्याचा सरकारमध्ये बुलंद आवाज झाला आहे. त्यामुळे एकप्रकारे पुढील पाच वर्षांसाठी साता-याच्या विकासाचा बॅकलॉग भरून निघेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. सातारामध्ये चार मंत्री असून इतिहासात प्रथमच चार मंत्री झाले असून मातब्बर खाती सुद्धा आली आहेत.
साता-यामध्ये भाजपकडून शिवेंद्रराजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. जयकुमार गोरे यांच्याकडे महत्त्वपूर्ण असलेल्या ग्रामविकास खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे भाजपचे संकटमोचक म्हणून जाणले जाणारे गिरीश महाजन यांच्याकडून हे खात काढून घेत जयकुमार गोरे यांना संधी देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे जयकुमार गोरे आणि शिवेंद्रराजे भोसले हे पहिल्यांदाच मंत्री झाले आहेत. असे असतानाही त्यांना महत्त्वपूर्ण खात्याची जबाबदारी मिळाली आहे. त्यामुळे एक प्रकारे भाजपमध्ये दोन्ही नेत्यांचे वजन वाढल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे शिवसेनेकडून शंभुराज देसाई यांना पर्यटन, खाणकाम माजी सैनिक कल्याण खाती मिळाली आहेत. त्यामुळे देसाई यांना सुद्धा महत्त्वपूर्ण स्थान एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून मकरंद पाटील यांना सुद्धा मदत आणि पुनर्वसन खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे त्यामुळे सातारा जिल्ह्यातील चारही मंत्र्यांकडे वजनदार खाती मिळाल्याने सातारच्या विकासाचा अनुशेष भरून निघेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
दुसरीकडे मंत्रिमंडळ खातेवाटपामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी गृह आणि ऊर्जा ही खाती आपल्याकडेच ठेवली आहेत.
एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास, गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) ही खाती देण्यात आली आहेत. अजित पवार यांनी सुद्धा अर्थ आपल्याकडेच ठेवण्यामध्ये यश मिळवले आहे. राज्य उत्पादन शुल्क हे खाते सुद्धा त्यांनी आपल्याकडे ठेवले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल खाते मिळवले असून राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आणि गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा खाते विभागून देण्यामध्ये आले आहे. चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे त्याच खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे यांच्याकडे पर्यावरण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे