17.2 C
Latur
Sunday, January 11, 2026
Homeराष्ट्रीयदहशतवाद्यांनी लपवलेला सॅटेलाईट डिव्हाइस सापडला

दहशतवाद्यांनी लपवलेला सॅटेलाईट डिव्हाइस सापडला

सीमापार सुरु होता संपर्क

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कारवाया खोडून काढण्यासाठी भारतीय लष्कर, सीमा सुरक्षा दल आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या विशेष ऑपरेशन ग्रुपने राबवलेल्या संयुक्त मोहिमेला मोठे यश मिळाले. शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांना दहशतवाद्यांनी लपवून ठेवलेले एक सक्रिय सॅटेलाईट कम्युनिकेशन डिव्हाइस सापडले आहे. यामुळे सीमापार बसलेल्या देशविरोधी कारवाया करणा-या गटांशी संपर्क साधण्याचे दहशतवाद्यांचे प्रयत्न उधळून लावले गेले आहेत.

जम्मूच्या दुर्गम आणि डोंगराळ भागात दहशतवादी लपल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. त्यानुसार राबवण्यात आलेल्या या मोहिमेत तांत्रिक उपकरणांचा शोध घेण्यात आला. जप्त करण्यात आलेले सॅटेलाईट डिव्हाइस हे अतिशय प्रगत असून त्याचा वापर इंटरनेट किंवा सामान्य मोबाईल नेटवर्कशिवाय संवाद साधण्यासाठी केला जात होता. या उपकरणाच्या माध्यमातून दहशतवादी नियंत्रण रेषेच्या पलीकडून सूचना घेत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर
नव्या वर्षाच्या सुरुवातीला जम्मूमधील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दहशतवादी दुर्गम भागातील गुहा आणि नैसर्गिक लपण्याच्या जागांचा वापर करत असल्याचे लक्षात आल्यानंतर लष्कराने हाय-टेक पाळत ठेवणारी यंत्रणा सक्रिय केली आहे. या कारवाईमुळे दहशतवाद्यांचे स्थानिक नेटवर्क आणि बा संपर्क तोडण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे.

सर्च ऑपरेशन सुरूच
जप्त केलेले डिव्हाइस सध्या फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आले असून त्यातील डेटा डिकोड करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याद्वारे दहशतवाद्यांचे पुढील कट आणि त्यांच्या लपण्याच्या ठिकाणांची माहिती मिळण्याची शक्यता आहे. यादरम्यान संपूर्ण परिसरात शोध मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून सीमा भागातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR