19.1 C
Latur
Thursday, January 2, 2025
Homeमुख्य बातम्याफेसबुकच्या माध्यमातून हनी ट्रॅपमध्ये अडकला सतेंद्र सिवाल

फेसबुकच्या माध्यमातून हनी ट्रॅपमध्ये अडकला सतेंद्र सिवाल

नवी दिल्ली : आयएसआयच्या एका महिला गुप्तहेराने खोटं नाव आणि पत्ता सांगून भारतीय दूतावासातील कर्मचारी सतेंद्र याला हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला. हा कर्मचारी हनी ट्रॅपमध्ये नेमकं कसा अडकला याबद्दल आता सविस्तर माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २०२१ मध्ये सतेंद्र रशियातील भारतीय दूतावासात तैनात असताना त्याला आयएसआयने टार्गेट केलं. यानंतर आयएसआयची महिला गुप्तहेर खोटं नाव वापरून सतेंद्रशी आधी सोशल मीडियावर आणि नंतर फोनवर बोलू लागली. दोघांमध्ये अनेकदा व्हिडिओ कॉल देखील होत असत. याचाच फायदा घेत आयएसआयच्या महिला एजंटने सतेंद्र याच्याकडून सर्व गोपनीय माहिती मिळवली.

फेसबुकवर झाली मैत्री
आयएसआयच्या महिला एजंटने सतेंद्रला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. आयएसआयच्या महिला गुप्तहेराने आपले नाव पूजा असल्याचे सांगितले आणि ती एक संशोधक असल्याचेही सांगितले. काही महिने या दोघांमधील बोलणे फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून सुरू होते. यानंतर आयएसआयच्या महिला गुप्तहेराने सतेंद्र याच्याकडे संशोधनाच्या बहाण्याने भारतीय लष्कर, भारतीय संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयासह अनेक प्रकारची माहिती मागितली. सतेंद्रला या कामासाठी पैसे ही देण्याबद्दल सांगण्यात आले.

तेव्हापासून सतेंद्र आयएसआयच्या महिला एजंटसोबत सर्व माहिती शेअर करत होता. यातील अनेक कागदपत्रांचे फोटो आरोपीने आपल्या मोबाइल कॅमे-यामध्ये घेतले असून मोबाइलच्या तपासणीनंतर ही बाब उघड झाली आहे. सध्या भारतीय गुप्तचर यंत्रणा कथित आयएसआय महिला एजंटच्या सोशल मीडिया अकाऊंटची तपासणी करत आहेत. त्या आयडीच्या संपर्कात अन्य लष्करी किंवा दूतावासातील कर्मचारी आहेत का, याचा देखील शोध घेतला जात आहे.

कोणती माहिती पाठवली?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्येंद्रने चौकशीदरम्यान सांगितले की, त्याला आयएसआयच्या एका महिला गुप्तहेराने फसवलं आणि सोशल मीडियावर तयार केलेल्या अकाऊंटद्वारे परराष्ट्र मंत्रालयाची कागदपत्रे महिलेला पाठवण्यात आली. यातील सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे परदेशात प्रशिक्षणासाठी उपस्थित असलेल्या किंवा ज्यांना परदेशात पाठवले जात होते, अशा लष्करी अधिका-यांची माहिती होती.

या अधिका-यांची तसेच युनिटची नावे व पदाचे नाव ही सर्व माहिती सतेंद्रने लीक केली होती. लष्करी करार आणि शस्त्रास्त्रांबाबत दोन्ही देशांमधील पत्रव्यवहाराची माहितीही लीक केली. याशिवाय आरोपी सतेंद्रने भारत आणि रशिया यांच्यातील परराष्ट्र मंत्रालय पातळीवरील अनेक महत्त्वाच्या करारांच्या प्रती आयएसआयला पुरविल्या. दरम्यान आता चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे आयएसआयकडे किती माहिती पोहोचली याचा तपास सुरू करण्यात आला आहे.

आयएसआयने परदेशी प्रशिक्षणासाठी जाणा-या लष्करी अधिका-यांची माहितीही मिळवली होती. यामुळे या अधिका-याच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. तसेच या अधिका-यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.

एटीएसच्या चौकशीदरम्यान सुरुवातीला सतेंद्रने या सर्व गोष्टी नाकारल्या. मात्र, नंतर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आरोपीचा मोबाइल रिकव्हर करण्यात आला आणि तपासादरम्यान अनेक लष्करी कागदपत्रे सापडली तेव्हा सतेंद्रने संपूर्ण हकीकत सांगीतली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR