मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणा-या परीक्षांमधील पेपरफुटी आणि गैरप्रकाराच्या मुद्यांवर विद्यार्थ्यांनी आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात आंदोलन केले होते. राज्य सरकारने चौकशीसाठी समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आणि अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी रजेवर जाण्याचा निर्णय घेतल्यानं विद्यार्थ्यांनी पुण्यातील आंदोलन मागं घेतले होते. विवेक भीमनवार रजेवर असल्याने त्यांच्या रजेच्या काळात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य सतीश बबन वाघोले यांच्याकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार दिला आहे.
राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्यावतीने हे आदेश जारी करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे अन्न व औषध प्रशासनाची औषध निरीक्षक पदाची परीक्षा घेण्यात आली होती. त्या परीक्षेचा पेपर फुटल्याचे समोर आल्यानंतर आयोगातील काही अधिका-यांना अटक करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटल्याचं स्पष्ट होताच विद्यार्थ्यांनी आयुक्त विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती.
राज्य सरकारच्यावतीनं विद्यार्थ्यांसोबत चर्चा करण्यात आली होती. मात्र, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीनं घेतल्या जाणा-या परीक्षांची तयारी करणा-या विद्यार्थ्यांनी १० दिवस पुण्यात आंदोलन करण्यात आले होते. हे आंदोलन सोडवण्यासाठी राज्य सरकारकडून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पुण्यात विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली होती. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागं घेण्यापूर्वी विवेक भीमनवार यांनी रजेवर जाण्याचा निर्णय घेतला होता. विवेक भीमनवार रजेवर गेल्यानं आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य सतीश बबन वाघोले यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.
वाघोले सप्टेंबरमध्येच एमपीएससीत दाखल
सतीश वाघोले हे सप्टेंबर २०२६ मध्येच महाराष्ट्र लोकसेवा आयोगात सदस्य म्हणून दाखल झाले होते. ७ सप्टेंबरला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून विवेक भीमनवार यांनीच सतीश वाघोले यांना सदस्य म्हणून गोपनीयतेची शपथ दिली होती. आता एका महिन्यानंतर बदलेल्या परिस्थितीमुळे सतीश वाघोले यांच्यावर अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
चौकशी आयोगाची अधिसूचना काढली
महाराष्ट्र सरकारकडून पुण्यातील विद्यार्थी आंदोलकांसोबत चर्चा करताना आयोगातील गैरप्रकार आणि पेपरफुटीसंदर्भात चौकशी समिती स्थापन करण्याचा शब्द देण्यात आला होता, त्यानुसार चौकशी आयोगाची अधिसूचना काढण्यात आली आहे. निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले चौकशी आयोगाचे अध्यक्ष असतील. निवृत्त न्यायमूर्ती पी. डी. नाईक यांच्यासह पाच सदस्यांचा आयोगात समावेश आहे. तुकाराम मुंढे, गणेश पाटील आणि लखामी गौतम यांचा आयोगात समावेश आहे.
















