अयोध्या : रामललाचे मुख्य पुजारी सत्येंद्रदास यांचे नुकतेच निधन झाले होते. ते ८५ वर्षांचे होते. ब्रेन स्ट्रोकमुळे त्यांचे लखनौच्या पीजीआय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. सत्येंद्रदास यांचे पार्थिव अयोध्येच्या रामघाटावरील त्यांच्या आश्रमात दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. गुरूवारी दुपारी त्यांना शरयू नदीमध्ये जलसमाधी देण्यात आली.
सत्येंद्र दास यांनी सुमारे ३३ वर्षे राम मंदिराची सेवा केली. फेब्रुवारी १९९२ मध्ये, जेव्हा वादग्रस्त जमिनीमुळे रामजन्मभूमीची जबाबदारी जिल्हा प्रशासनाकडे सोपवण्यात आली, तेव्हा जुने पुजारी महंत लालदास यांना काढून टाकण्याबाबत चर्चा सुरू झाली. दरम्यान, १ मार्च १९९२ रोजी सत्येंद्र दास यांची नियुक्ती भाजप खासदार विनय कटियार, विश्व हिंदू परिषद नेते आणि तत्कालीन विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख अशोक सिंघल यांच्या संमतीने करण्यात आली.
३ फेब्रुवारी रोजी मेंदूत रक्तस्त्राव झाल्यानंतर आचार्य सत्येंद्र दास यांना लखनौ पीजीआयच्या न्यूरोलॉजी वॉर्डच्या एचडीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. हनुमानगढी येथील गुरु आश्रम सोडल्यानंतर त्यांनी रामघाट मोहल्ला येथील सत्यधाम गोपाळ मंदिराचे महंतपद स्वीकारले. यानंतर १९९२ मध्ये त्यांची राम मंदिरात नियुक्ती झाली तेव्हा त्यांना दरमहा १०० रुपये पगार मिळत होता. २०१८ पर्यंत सत्येंद्र दास यांचा पगार फक्त १२ हजार रुपये दरमहा होता.
२०१९ मध्ये, अयोध्या आयुक्तांच्या सूचनेनुसार, त्यांचे वेतन १३,००० रुपये करण्यात आले. सत्येंद्र दास यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, त्यांनी १९७५ मध्ये संस्कृत विद्यालयातून आचार्य पदवी प्राप्त केली होती. यानंतर, १९७६ मध्ये, त्यांना अयोध्येतील संस्कृत महाविद्यालयात व्याकरण विभागात सहाय्यक शिक्षकाची नोकरी मिळाली.