मुंबई : आम्हाला अयोध्येतील मंदिरात होणा-या प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त सुटी नको. आमचा अभ्यास बुडला तर रामलल्ला सुद्धा खुश होणार नाही, असे म्हणत विद्यार्थिनींनी २२ जानेवारीची सुटी नाकारली. प्रख्यात नृत्यांगना आणि ‘स्मितालय’च्या अध्यक्षा झेलम परांजपे यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत आपल्या शाळेतील विद्यार्थिनींचा स्तुत्य निर्णय समोर आणला आहे.
अयोध्येतील श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि रामलल्लांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेकडे अवघ्या देशभरातील रामभक्तांचे डोळे लागले आहेत. येत्या सोमवारी अर्थात २२ जानेवारी रोजी हा सोहळा पार पडणार आहे. हा क्षण ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्यासाठी काही जणांनी अयोध्येकडे कूचही केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील जनतेला दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारकडून सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे.
परंतु झेलम परांजपे अध्यक्षा असलेल्या शाळेतील विद्यार्थिनींनी ही सुटी नाकारली आहे. त्याबद्दल खुद्द झेलम परांजपेंनी फेसबुक पोस्ट लिहून त्यांचा संकल्प व्यक्त केला आहे. आम्ही सावित्रीच्या लेकी आणि आमचे बांधव जोतिबांची लेकरे….आम्हाला रामलल्ला प्राणप्रतिष्ठेची सुटी नको. आमचा अभ्यास बुडला तर रामलल्ला सुद्धा खुश होणार नाही. आमच्या अध्यक्षा झेलमताईंनी निर्णय घेतला आहे की शाळा चालू राहणार…. असे त्यांनी लिहिले आहे. या पोस्टवर अनेकांनी लाईक आणि कमेंट करून पाठिंबा दर्शवला आहे. ही पोस्ट अनेकांनी शेअर केली असून सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.