16.2 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeछत्रपती संभाजीनगरसावेंची भिस्त विकास कामांवर, तर जलीलांची मुस्लीम मतांवर

सावेंची भिस्त विकास कामांवर, तर जलीलांची मुस्लीम मतांवर

संभाजीनगर : विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद (पूर्व) मतदारसंघात भाजप आणि ‘एमआयएम’मध्ये कांटे की टक्कर असल्यासारखे चित्र आहे. २०१४ पासून एमआयएम या मतदारसंघात भाग्य आजमावत आहे. भाजपने दोन वेळा ‘एमआयएम’ला धूळ चारली असून, यावेळी तिस-यांदा भाजप आणि एमआयएम आमने-सामने आहे.

भाजप महायुतीकडून गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, तर एमआयएमकडून इम्तियाज जलील यांच्यात थेट लढत होत असून, सोबत काँग्रेसचे लहूजी शेवाळे, सपाचे उमेदवार डॉ. गफ्फार कादरी, वंचितचे अफसर खान, बसपच्या शीतल बनसोडे मिळून मतदारसंघात सर्वाधिक २९ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात १६ मुस्लीम उमेदवारांचा समावेश आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या या मतदारसंघात उमेदवारांची भाऊगर्दी असली, तरी खरी लढत महायुतीचे उमेदवार अतुल सावे आणि ‘एमआयएम’चे इम्तियाज जलील यांच्यातच होत असल्याचे चित्र सध्या आहे.

अतुल सावे औरंगाबाद (पूर्व) मतदारसंघातून तिस-यांदा मैदानात आहेत. २०१४, २०१९ ला या मतदारसंघातून विजय मिळविल्यानंतर यावेळी ते हॅट्ट्रिक साधतील की नाही, याकडे सा-यांचे लक्ष लागलेले आहे. जलील पहिल्यांदाच या मतदारसंघातून भाग्य आजमावत आहेत. मुस्लीम मतविभाजन किती प्रमाणात होते, त्यावर महायुतीची भिस्त आहे.

लोकसभेतील मतांतर…
लोकसभेला पूर्व मतदारसंघातून नोटासह २ लाख ६ हजार ६३३ मतदान झाले होते. यात ‘एमआयएम’ला सर्वाधिक ८९ हजार ६३३ मते मिळाली होती. उद्धवसेनेला (महाविकास आघाडी) ३८ हजार ३५०, तर शिंदेसेनेला ६३ हजार २२८ मते मिळाली. वंचितला ८ हजार १४५ मते होती. पूर्व मतदारसंघात ३ लाख ५२ हजार ३१३ मतदारांमध्ये पुरुष मतदार १ लाख ८२ हजार ५२७, तर महिला मतदार १ लाख ६९ हजार ७७२ आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR