22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeसोलापूरसावंत यांनी दिली दोनशे खाटांच्या दोन्ही नवीन रुग्णालयांना भेट

सावंत यांनी दिली दोनशे खाटांच्या दोन्ही नवीन रुग्णालयांना भेट

सोलापूर : गुरुनानक चौकात साकारलेल्या जिल्हा महिला व बाल सरकारी रुग्णालय तसेच जिल्हा रुग्णालय या दोन्ही रुग्णालयांचे २९ फेब्रुवारी पूर्वी लोकार्पण होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सोलापुरात दिली. आरोग्यमंत्री सावंत यांनी गुरुनानक चौकातील दोनशे खाटांच्या दोन्ही नवीन रुग्णालयांना भेट दिली. बांधकामाची पाहणी केली. काही दुरुस्ती सुचविल्या. आवश्यक उपाययोजना लवकरात लवकर करण्याच्या सूचना त्यांनी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

मेडिकल फर्निचरची काम युद्धपातळीवर सुरू असून, नवीन भरतीदेखील सुरू केली आहे. २९फेब्रुवारीअखेर दोन्ही रुग्णालये रुग्णसेवेत दाखल होतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. सरकारी रुग्णालयाचे खासगीकरण होणार असल्याची टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी केली होती. यावर स्पष्टीकरण देताना सावंत म्हणाले, दोन्ही रुग्णालयांचे कदापि खासगीकरण होणार नाही. आ. शिंदेंना माहीत नाही. नवीन रुग्णालये कोणाचे आहे आणि जुने सिव्हिल हॉस्पिटल कोणाचे आहे. सिव्हिल हॉस्पिटल यापूर्वीच मेडिकल कॉलेजकडे सुपुर्द केलेले आहे. त्यांच्याकडे असलेली माहिती चुकीची आहे, असेही ते बोलले.

सावंत म्हणाले, दोन्ही रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. फिनिशिंगसह काही किरकोळ कामे राहिली आहेत. त्यासंदर्भात लवकरच संबंधित ठेकेदार आणि पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांची मुंबईत बैठक घेतो. कामे पूर्ण व्हायला आणखी किती दिवस लागतील, याची माहिती घेतो. कामे लवकर पूर्ण करून फेब्रुवारीअखेर दोन्ही रुग्णालयांचे लोकार्पण करू.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR