पुणे : ‘धर्म म्हणजे पूजा नसून सत्य, करुणा, शुचिता आणि तपस्या यातून धर्माची मूल्ये पुढे आली आहेत. त्यामुळे ‘हे खा’, ‘ते खा’ किंवा ‘ते खाऊ नका’, ‘शिवू नका’, हे सांगणे म्हणजे धर्म नाही. हिंदू धर्म हे नाव नाही, तर एका विचाराने जगणारे आणि सर्वांना स्वीकारणारे ते एक उदात्त विशेषण आहे असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे सोमवारी व्यक्त केले.
‘साप्ताहिक विवेक’ आणि श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीने डॉ. मिलिंद पराडकर लिखित ‘तंजावरचे मराठे : दक्षिणेच्या इतिहासातील योगदान’ या पुस्तकाचे प्रकाशन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. श्रीमंत राजश्री बाबाजी राजेसाहेब भोसले छत्रपती, महाराणी गायत्री राजे भोसले, जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, हिंदुस्थान प्रकाश संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह सुधीर थोरात आदी या वेळी उपस्थित होते.
हिंदवी राष्ट्रीय प्रेरणा या ग्रंथ प्रकल्पाचे या वेळी उद्घाटन झाले. ‘जगण्याच्या सुरक्षिततेसाठी नव्हे, तर ‘वसुधैव कुटुंबकम’ हा शाश्वत धर्म जगाला देण्यासाठी आपल्या राष्ट्राची निर्मिती झाली आहे. सत्ययुगापासून स्वातंत्र्य लढ्यापर्यंत धर्म हीच आपली शाश्वत प्रेरणा राहिली आहे. यालाच हिंदू प्रेरणा असे म्हटले जाते. हिंदू म्हणजे मुस्लिम विरोध नाही, तर सर्व समाजाचे रूप दर्शविणारे विशेषण आहे. सर्व विविधतांना स्वीकारणारे तो उदात्त भाव आहे असे डॉ. भागवत यांनी सांगितले.