21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरएसबीआयचे एटीएम दरोडेखोरांनी पळवले

एसबीआयचे एटीएम दरोडेखोरांनी पळवले

अहमदपूर : प्रतिनिधी
अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे अज्ञात सराईत दरोडेखोरांनी एका तवेरा गाडी मधून येऊन शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास धाडसी दरोडा टाकत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेचे ए.टी.एम.च पळवल्याची घटना घडली असून सदरील ए.टी.एम.मशीन मध्ये तब्बल २६ लाख ५८ हजार २०० रोकड असल्याचे अहमदपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेमुळे शिरूर ताजबंद परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील बसस्थानकाच्या मागील भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रताप पाटील यांच्या इमारतीमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेला लागून सदरील बँकेचे ए.टी.एम. आहे. मात्र शुक्रवार दि.०८ डिसेंबर रोजी मध्यरात्रीनंतर ठीक ०१:४७ वाजता एका विनाक्रमांकाच्या पांढ-या रंगाच्या तवेरा गाडी मधून अज्ञात पाच दरोडेखोर उतरले. सदरील चोरी करताना त्यांनी पोलिसांना आपली ओळख पटू नये किंवा बोटाचे ठसेही सदरील ठिकाणी सापडू नयेत, या उद्देशाने हातात हातमोजे घालत तोंडाला मास्क व रुमाल बांधत आपला संपूर्ण चेहरा झाकला होता.

या दरोडेखोरांनी अवघ्या सहा मिनिटात एका वायरच्या साह्याने ए.टी एम. मशीन तोडून ती पसार केल्याचे सी.सी.टी.व्ही कॅमेरा मध्ये दिसत आहे. अवघ्या सहा मिनिटात या दरोडेखोरांनी ए.टी.एम. मशीन तोडली. व दरोडेखोर ज्या गाडीमधून आले त्या तवेरा कंपनीच्या गाडीमध्ये मशीन टाकली. सदर एटीएम मशीन तोडून गाडीत टाकण्याची प्रक्रिया त्यांनी अतिशय वेगवान पद्धतीने केली असून त्यांनी ०१ वाजून ५३ मिनिटाला आपली गाडी घटनास्थळावरून हलवली असल्याचे निदर्शनास येत आहे.

तर घटनास्थळावरून सदरील गाडी हलवल्यानंतर हे दरोडेखोर अतिशय वेगाने मुखेडकडे जाणा-या महामार्गाच्या दिशेने पसार झाले असल्याचे हाडोळती ते जांब दरम्यान असलेल्या टोल नाक्यावरील सी.सी.टी.व्ही फुटेज मध्ये स्पष्ट दिसत आहे. दरम्यान हे अंतर सदरील दरोडेखोरांनी ए.टी.एम. मशीन गाडीत टाकल्यापासून पुढील अवघ्या आठ मिनिटात अर्थातच ०२ वाजून ०१ मिनिटापर्यंतच म्हणजे अवघ्या आठ मिनिटात पार केल्याचे दिसून येत आहे. सदरील घटना समजताच अहमदपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर देडे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान ईपीएस कंपनीचे चॅनल मॅनेजर गणेश कानुरे रा. महादेव नगर उदयगिरी महाविद्यालया समोर उदगीर यांनी दिलेल्या तक्रारीवरून अहमदपूर पोलीस ठाण्यात या अज्ञात दरोडेखोरा विरोधात गु.र.न. ६९३/२०२३ कलम ३७९,३४ भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर व े पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि तोटेवाड हे करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR