23 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeसोलापूरपटसंख्या कमी असलेल्या शाळा होणार 'समूह शाळा पॅटर्न' नुसार समायोजीत

पटसंख्या कमी असलेल्या शाळा होणार ‘समूह शाळा पॅटर्न’ नुसार समायोजीत

सोलापूर : कमी पटसंख्येच्या शाळा आता जवळील शाळांमध्ये समायोजित करण्यासाठी राज्य स्तरावरून ‘समूह शाळा पॅटर्न’ राबविला जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील ४९१ शाळांचा पट साडेचार हजार सुद्धा नाही, पण त्याठिकाणी एक हजार शिक्षक कार्यरत असल्याची वस्तुस्थिती आहे. त्यातील बहुतेक शाळा या नवीन पॅटर्ननुसार दुसऱ्या शाळांमध्ये समाविष्ट होतील, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

गावोगावी वाढलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा, तुलनेने मराठी माध्यमांच्या शाळांची खालावलेली गुणवत्ता, तंत्रज्ञानाचा अभाव, शिक्षकांची भरमसाट रिक्तपदे आणि पालकांचा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वाढलेला कल, यामुळे जिल्हा परिषदेसह खासगी अनुदानित मराठी माध्यमांच्या शाळांची पटसंख्या खूपच कमी झाल्याची वस्तुस्थिती आहे. गावागावात पाचवी ते दहावीपर्यंत हायस्कूल झाल्याने चौथीनंतर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्या कमी झाली.

जिल्हा परिषदेच्या ज्या शाळांची पटसंख्या खूपच कमी आहे. त्या शाळांसाठी शासन स्तरावर ‘समूह शाळा पॅटर्न’ राबविला जात आहे. तत्पूर्वी, अशा शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.असे प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर प्रसाद मिरकले यांनी सांगीतले.

दुसरीकडे इंग्रजी माध्यमांच्या स्वयंघोषित शाळांमुळे झेडपीच्या पहिली ते चौथीपर्यंतचा पट कमी झाला. अशी वस्तुस्थिती असतानाही मागील सात वर्षांत पुरेशा प्रमाणात शिक्षक भरती करण्यात आली नाही. दुसरीकडे पटसंख्या कमी झालेल्या शाळांवरील शिक्षक मात्र ‘जैसे थे’ ठेवले. पहिली ते पाचवी किंवा सातवीपर्यंतच्या वर्गात अवघे सात-नऊ विद्यार्थी असतानाही त्याठिकाणी दोन-तीन शिक्षक आणि पटसंख्या जास्त असलेल्या शाळांमध्ये केवळ चार-पाच शिक्षक, अशी विषमता पाहायला मिळाली. त्यामुळे देखील अनेक पालकांनी आपल्या मुलांचे प्रवेश दुसऱ्या शाळांमध्ये घेतल्याचीही उदाहरणे आहेत. सोलापूर जिल्ह्यातील ४९१ शाळांची पटसंख्या १ ते २० पर्यंतच असून त्यात जिल्हा परिषदेच्या तब्बल ३८२ शाळा आहेत. जिल्हा परिषदेच्या ५८ शाळा व खासगी अनुदानितच्या ५२ प्राथमिक शाळांचा पट १० सुद्धा नाही. त्यामुळे या शाळांचे भविष्य काय, याचे उत्तर आगामी शैक्षणिक वर्षात निश्चितपणे मिळेल असेही सूत्रांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR