नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात भारतात तीव्र संताप आहे. त्यातच नियंत्रण रेषेवर तणाव वाढला आहे. पाकिस्तानने सीमा रेषेवर रणगाडे तैनात केले आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचे ढग गडद होत आहेत. दरम्यान भारतात सुरू असलेल्या आयपीएल २०२५ टुर्नामेंटची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. सध्या आयपीएलचा १८ वा हंगाम सुरू आहे. ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आहे. प्रेक्षक आणि खेळाडूंच्या सुरक्षेसाठी ही खास यंत्रणा दिमतीला लावण्यात आली आहे.
बिग बँग सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड इइइर ने शनिवारी देशभरात जिथे इंडियन प्रीमियर लिगचे सामने खेळण्यात येत आहे, तिथे स्वदेशी अँटी ड्रोन सिस्टिम कार्यान्वीत केली आहे. वज्र सुपर शॉट सुद्धा तैनात करण्याची घोषणा करण्यात आली आहे. वज्र सुपर शॉट हे एक हलके, हातात धरण्याजोगे अँटी ड्रोन शस्त्र आहे. ते ४ किलोमीटर दूरपर्यंतच्या ड्रोनचा लागलीच शोध घेते आणि शत्रूच्या ड्रोन कम्युनिकेशन सिग्नल तोडते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा धोका नसतो.
बीबीबीएसने याविषयी एका पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार, ही प्रणाली पोर्टेबिलिटी आणि अनुकूल फ्रिक्वेन्सी जॅमिंगसह समोरच्या शस्त्राला प्रभावित करते. राष्ट्रीय सुरक्षा आणि स्वदेशी रक्षा प्रणाली विकसीत करण्यासाठी बीबीबीएस नेहमी तत्पर असल्याचे कंपनीने म्हटले आहे. जर स्टेडियमच्या जवळपास एखादे फ्लाईंग ऑब्जेक्ट, ड्रोन वा इतर एखादी यंत्रणा आकाशात दिसली तर हे अँटी ड्रोन सिस्टिम त्याचे कम्युनिकेशन सिग्नल डॅमेज करते. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेला बाधा येत नाही.
या सिस्टिमचा आयपीएल २०२५ मधील ४३ व्या, चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद या दोन संघाच्या सामन्या दरम्यान पहिल्यांदा करण्यात आला. चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला होता. त्यानंतर प्रत्येक सामन्यात ही यंत्रणा लागू करण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे स्टेडियमवर खुल्या आकाशातून सुरक्षा यंत्रणेला धोका होऊ नये याची काळजी घेतली जाते. त्यासाठी स्वदेशी अँटी ड्रोन सिस्टिमचा वापर करण्यात येत आहे.