नवी दिल्ली : संसदेच्या सुरक्षेत झालेल्या गंभीर चुकीमुळे दोन्ही सभागृहात विरोधी पक्षाचे खासदार प्रचंड गदारोळ करत आहेत. गुरुवारी लोकसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी याच मुद्द्यावर सरकारकडे उत्तरे मागितली. सभागृहाचे कामकाज सुरू होताच त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. यादरम्यान लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मोठे वक्तव्य केले. संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी लोकसभा सचिवालयाची असल्याची माहिती त्यांनी दिली.
आज पुन्हा संसदेच्या सुरक्षेच्या मुद्यावर चर्चा सुरू झाली. यावेळी ओम बिर्ला म्हणाले की, संसद सचिवालयाच्या कामात सरकार कधीही हस्तक्षेप करत नाही. संसदेच्या संपूर्ण परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी लोकसभा सचिवालयची असते. संसदेची सुरक्षा सरकारचे नाही, तर आमचे कार्यक्षेत्र आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी विरोधांनी प्रचंड गोंधळ सुरू केला, त्यानंतर लोकसभेचे दुपारपर्यंत तहकूब करण्यात आले.
काय म्हणाले राजनाथ सिंह?
संसदेत घुसखोरीच्या घटनेबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, या प्रकरणाचा सर्वांनी निषेध केला पाहिजे. आपण सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. द्वेष आणि अराजकता पसरविणा-यांना पास मिळू नये, याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. जुन्या इमारतीतही कागद फेकण्याच्या आणि सभागृहात उड्या मारण्याच्या घटना घडल्या आहेत. यावरुन विरोधकांनी सभागृहात घोषणाबाजी आणि गदारोळ करण्याची गरज नाही.
आठ सुरक्षा कर्मचारी निलंबित
संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींबाबत मोठी कारवाई करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने आठ कर्मचा-यांना निलंबित केले आहे. संसद भवनातील सुरक्षा कर्मचा-यांशी संबंधित हे लोक आहेत. दरम्यान, १९ डिसेंबर २००१ रोजी संसद भवनावर दहशतवादी हल्ला झाला होता. कालच्या घटनेने २२ वर्षे जुन्या जखमा पुन्हा एकदा ताज्या केल्या आहेत.