लातूर : महाकुंभमेळ्यात महिलांचे स्नान करताना आणि कपडे बदलतानाचे व्हीडीओ काढून विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी ‘नीट’ची तयारी करणा-या महाराष्ट्रातील दोघांसह प्रयागराजमधील एकाला अटक केली. राजकोटमध्ये महिलांच्या रुग्णालयातील आक्षेपार्ह व्हीडीओची २ हजार रुपयांना विक्री केल्याच्या प्रकरणाची चौकशी करताना हा प्रकार समोर आला.
याप्रकरणी गुजरात पोलिसांनी लातूर येथील प्रज्ज्वल अशोक तेली आणि सांगली येथील राजेंद्र पाटील याच्यासह प्रयागराजमधील मांडा येथील चंद्रप्रकाश फूलचंद यांना अटक केली आहे. चौकशीदरम्यान अनेक महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. संशयित आरोपी टेलिग्राम ग्रुपवर प्रत्येकी दोन हजार रुपयांना महिलांचे आक्षेपार्ह व्हीडीओ विकत होते. यूट्यूब आणि टेलिग्रामवर व्हीडीओ विकून पैसे कमवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. चंद्रप्रकाशच्या यूट्यूब चॅनेलवर महाकुंभात महिला स्नान करताना आणि कपडे बदलतानाचे काही व्हीडीओ आणि छायाचित्रे आढळली आहेत.
अहमदाबाद पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी कबूल केले की त्यांनी रुग्णालये आणि इतर सार्वजनिक ठिकाणांहून बेकायदेशीरपणे सीसीटीव्ही फुटेज मिळवले. त्यांनी ते टेलिग्राम चॅनेलवर क्यूआर कोड स्वरूपात प्रत्येकी २००० रुपयांना विकले. ते एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी व्हर्च्युअल नंबर वापरत होते. तिन्ही आरोपींना १ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दोघेजण करत होते ‘नीट’ची तयारी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेली आणि पाटील एकमेकांना ओळखत होते आणि लातूरमध्ये नीटची तयारी करत होते. तर, चंद्रप्रकाश हा एका मनरेगा कामगाराचा मुलगा आहे. तो विवाहित असून त्याला एक मुलगी आहे. चंद्रप्रकाश याला दोन दिवसांपूर्वी १९ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता अहमदाबाद पोलिसांनी अटक केली. अहमदाबाद सायबर क्राईमच्या पोलिस उपायुक्त लविना सिन्हा यांनी सांगितले की, चंद्रप्रकाश याने काही महिन्यांपूर्वी एक यूट्यूब चॅनल सुरू केले होते.
त्यावर महाकुंभात स्नान करणा-या महिला यात्रेकरूंचे व्हीडीओ अपलोड केले होते. चंद्रप्रकाश, तेली आणि पाटील यांनी सबस्क्राइबर्सकडून पैसे कमविण्याच्या उद्देशाने टेलिग्राम अॅपवर महिलांचे आक्षेपार्ह व्हीडीओ अपलोड केले होते. राजकोटमधील एका रुग्णालयाचा व्हीडीओ यूट्यूबवर व्हायरल झाल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. काही हॅकर्सनी हॉस्पिटलचे सीसीटीव्ही सिस्टम हॅक करून फुटेज मिळवले होते.