पुणे : विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाला. तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. यानंतर सातत्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएमबाबत शंका उपस्थित करण्यात आली आहे. याविरोधात ९५ वर्षांचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी आंदोलन सुरू केले आहे.
राज्यघटना आणि लोकशाहीची सध्या थट्टा सुरू असल्याची टीका करत वयाच्या ९५ व्या वर्षात पदार्पण केलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव आजपासून महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेश उपोषण करणार आहेत. महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून त्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे.
निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विविध आकडेवारीच्या आधारे ईव्हीएममध्ये घोटाळा झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. महायुतीला मिळालेल्या या मोठ्या यशामागे ईव्हीएम घोटाळा असल्याचा आरोप सातत्याने करण्यात येत आहे. या ईव्हीएम विरोधात विविध ठिकाणी आंदोलनेदेखील करण्यात आली आहेत. पुण्यात देखील अशाच प्रकारचे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
बाबा आढाव म्हणाले, निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटप करणारी सरकारी योजना जाहीर करणे म्हणजे भ्रष्टाचाराला अधिकृत करणे आहे. त्यावर निवडणूक आयोगाने कसलाही आक्षेप न घेणे अनाकलनीय आहे. ईव्हीएममध्ये घोटाळा झाला असण्याची दाट शक्यता आहे. या माध्यमातून विधानसभा निवडणुकीत लोकशाहीचे वस्त्रहरण करण्यात आले आहे.