लातूर : ज्येष्ठ समाजवादी नेते, पुरोगामी, डाव्या चळवळीचे व कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लातूर जिल्हाध्यक्ष आणि लातूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड. मनोहरराव गोमारे यांचे आज (बुधवार, दि. २० डिसेंबर) पहाटे ५.३० वा. दु:खद निधन झाले.
लातूर जिल्हानिर्मिती आंदोलनातील अग्रणी नेते म्हणून अॅड. मनोहरराव गोमारे यांची ओळख होती. लातूरचे एसटी डिव्हिजन आंदोलन तथा मराठवाडा विकास आंदोलनाचे ते लढवय्ये नेते होते. लातूरच्या शैक्षणिक पॅटर्नमध्ये अॅड. गोमारे यांचा मोलाचा वाटा होता.
दोन दिवसांपूर्वी त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. आज बुधवारी पहाटे त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज (बुधवारी) दुपारी ३ वा. मारवाडी स्मशानभूमी, लातूर येथे अन्त्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.