छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या सर्व पोलिस ठाण्यांत आता सायबर गुन्ह्यांसाठी स्वतंत्र डेस्क असणार आहे. सायबर गुन्ह्यांची संख्या वाढत असल्याने जलद तपासासाठी संभाजीनगर शहरातील १६ पोलिस ठाण्यांमध्ये अशा तक्रारींसाठी स्वतंत्र डेस्क सुरू करण्याचा निर्णय पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी घेतला आहे. त्यानुसार डेस्क सुरू करण्यात येत आहे.
सध्या हॅकिंग, फिशिंग म्हणजेच लोकांना फसवून त्यांची वैयक्तिक माहिती किंवा बँक खाते नंबर, पासवर्ड इत्यादी प्राप्त करून फसवणूक केली जात आहे. तसेच मालवेयरद्वारे डेटा चोरी करणे, रॅन्सम वेअर म्हणजे डेटा चोरी करून त्या बदल्यात पैशाची मागणी करणे, ऑनलाईन फसवणूक, ऑनलाईन शॉपिंग फसवणूक, क्रेडिट कार्ड स्कॅम्स, ऑनलाईन छळ, सोशल मीडियावर किंवा अन्य डिजिटल प्लॅटफॉर्मवर बदनामी करून मानसिक त्रास देणे, संवेदनशील डेटा चोरी करणे असे अनेक प्रकार सध्या सायबर भामट्यांकडून होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.
दररोज अनेक जण या सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकून बळी ठरत आहेत. त्यामुळे पोलिस आयुक्तालयात एकच सायबर पोलिस ठाणे असून जिथे तक्रारदार धाव घेत होते. अर्थात सायबर गुन्हेगारीच्या वाढत्या तक्रारींमुळे आलेल्या तक्रारींची लवकर दखल घेण्यात अडचणी येत होत्या. एक तक्रार निकाली लागत नाही; तोच दुसरी तक्रार दाखल होत असते. यामुळे पोलिस आयुक्तांनी स्वतंत्र डेस्क तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
पोलिस उपनिरीक्षकावर जबाबदारी
आता सायबर तक्रारींसाठी प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये स्वतंत्र डेस्क करण्यात येत असून सायबर क्राईम संदर्भात तपास व चौकशी जलद गतीने होण्यासाठी आणि तांत्रिक पुरावे गोळा करून प्रभावीपणे तपास करता येईल. यादृष्टीने प्रत्येक पोलिस ठाण्यात १ उपनिरीक्षक आणि २ अंमलदार यांच्यावर जबाबदारी असणार आहे.