पुणे : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील सर्व नेते, अभिनेते, साहित्यिक यांनी मतभेद सोडून मराठी भाषेसाठी एकत्र यावे, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांनी रविवारी येथे व्यक्त केले. विश्व मराठी साहित्य संमेलनाची सांगता राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज पार पडली. यावेळी ठाकरे यांच्या हस्ते अभिनेते रितेश देशमुख यांना कलारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मराठी भाषा मंत्री उदय सामंत, ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे, ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, रवींद्र शोभणे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे उपस्थित होते.
आपल्या भाषेवरती ठाम राहायला हवे, तेव्हाच जग तुम्हाला दाद असते असे नमूद करुन राज ठाकरे म्हणाले की, आज फ्रेंच लोकांना आपल्या भाषेचा भरपूर अभिमान आहे. त्यामुळे त्यांच्याशी फ्रेंचमध्येच संवाद साधावा लागतो. आपण आपल्या भाषेतून, इतिहासातून बोध घेणार नसेल, तर त्याचा काही फायदा नाही.
मराठी भाषिकांचे अस्तित्व टिकावे
महाराष्ट्रात विकासाच्या नावाखाली खासगी कंपन्या, उद्योजकांना का मोकळीक दिली. हजारो एकर जमिनी बाहेरच्या लोकांकडून खरेदी केल्या जातात. जमिनी जाणार असतील, लोक बेघर होणार असतील, तर काही कामाचे नाही. मराठी भाषिकांचे अस्तित्व टिकले नाही तर मराठी भाषा कुठून टिकेल. त्यामुळे राज्य सरकारने मराठी माणसाचे अस्तित्व टिकविण्यासाठी प्रयत्न करायला हवे, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
मराठी माझ्या हृदयात
मराठी घरात जन्म घेणे ही भाग्याची बाब आहे. जन्म घेतल्यावर पहिला शब्दही मराठीत कानावर पडतो. या मराठीमुळे आपली ओळख होते. हिंदी सिनेमात काम करीत असलो, तरी मराठी माझ्या हृदयात आहे. त्यामुळे मराठीचे प्रेम कमी होणार नाही. मराठी चित्रपट तयार करणेही सोडणार नाही. माझ्या प्रोडक्शन हाऊसने १० वर्षात केवळ मराठी चित्रपटांची निर्मिती केली असून, यापुढेही सुरू राहील. विश्व मराठी संमेलनात कलारत्न पुरस्कार देऊन सन्मान केल्याबद्दल अभिनेते रितेश देशमुख यांनी आभार व्यक्त केल.
पुढील विश्व संमेलन नाशिकला
मराठी भाषेचा मंत्री म्हणून मला अभिमान आहे, असे सांगत उदय सामंत यांनी असाच अभिमान मराठी भाषेच्या विभागाच्या अधिका-यांना वाटायला हवा, असे म्हटले. आता पुढील संमलेन नाशिक शहरात होणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.