पंढरपूर : कार्तिकी सोहळ्यासाठी पंढरी नगरी सज्ज झाली असून, आज कार्तिक शुद्ध दशमीला शहरात सात लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल झाले आहेत. दरम्यान, आज सायंकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हेलिकॉप्टरने पंढरपूर येथे दाखल होतील. तसेच, उद्या पहाटे त्यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा संपन्न होणार आहे.
सोबतच, मंदिराला ७०० वर्षांपूर्वीचे पुरातन रूप देण्याच्या मंदिर विकास आराखड्याचा नारळ देखील फडणवीस यांच्या हस्ते फोडण्याची तयारी मंदिर प्रशासनाने केली आहे. त्यामुळे, ७३ कोटींच्या या आराखड्याच्या कामांना सुरुवात होण्याची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या विठूरायाची महापूजा होणार आहे. तर, उपमुख्यमंत्री आपल्या दौ-यात पंढरपूर विकासाच्या २७०० कोटींच्या प्रकल्पाबाबत आणि कॉरिडॉरबाबत काय घोषणा करणार हे पाहावे लागणार आहे. तसेच, पंढरपूरमध्ये दाखल झाल्यावर आज उपमुख्यमंत्री फडणवीस हे मराठा समाजाच्या शिष्टमंडळाशी चर्चा करणार आहेत. यासोबतच, धनगर समाज आणि आदिवासी कोळी समाजाच्या शिष्टमंडळाकडून देखील फडणवीस यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे