मैदानाबाहेरून
भारतीय संघाने रांचीमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा ५ विकेट्सनी पराभव करत पाच सामन्यांची मालिका जिंकली आहे. तसेच इंग्लंडविरुद्धच्या या कसोटी मालिकेत भारतीय संघाने ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकून भारतीय संघाने मोठा विक्रम केला आहे. असे करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघांच्या नावावरही हा महान विक्रम कधीच नोंदवला गेला नाही, जो भारतीय संघाने रांचीमध्ये आपल्या नावावर केला आहे. याबरोबरच भारताचा हा मायदेशातला सलग १७वा कसोटी मालिका विजय आहे.
चौथ्या कसोटीत आर. अश्विन, आकाश दीप, ध्रुव जुरेल, यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांनी दमदार कामगिरी केली. या सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात ३५३ धावा केल्या. त्यानंतर भारताने ३०७ धावा केल्या. दुस-या डावात इंग्लंडला १४५ धावांत गुंडाळले. विजयासाठी १९२ धावांचे आव्हान मिळाल्यावर हे आव्हान ५ विकेट्सच्या मोबदल्यात पार करत सामना आणि मालिका भारतीय संघाने खिशात घातली आहे. नोव्हेंबर २०१२ मध्ये इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर भारतीय संघाने मायदेशात गेल्या बारा वर्षांत एकही कसोटी मालिका गमावलेली नाही.
त्यामुळे मायदेशात सलग सर्वाधिक कसोटी मालिका जिंकण्याच्या बाबतीत भारतीय संघानंतर ऑस्ट्रेलियाचा क्रमांक लागतो. मायदेशात सलग १० कसोटी मालिका दोनदा जिंकणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला संघ आहे. तसेच मायदेशात झालेल्या गेल्या ५० कसोटी सामन्यांत भारताने केवळ ४ सामने गमावले आहेत. यामुळे भारतीय कसोटी संघासाठी भारत हा बालेकिल्ला बनला आहे. या मालिकेतील पहिला हैदराबाद कसोटी सामना टीम इंडिया २८ धावांनी पराभूत झाली होती पण त्यानंतर तिन्ही सामने राजकोट, विशाखापट्टणम, रांची येथील सामन्यांत मात्र सलग तीन विजय मिळवले होते. विशाखापट्टणम १०६ धावांनी, राजकोट कसोटी ४३४ धावांनी, तर रांची कसोटी पाच विकेट टाकून जिंकली.
– डॉ. राजेंद्र भस्मे, कोल्हापूर