मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी, पुणे यांनी आळंदी परिसरातील अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांची तपासणी सुरू केली आहे. लैंगिक शोषण प्रकरणात महिला आयोगाकडून ही मोहीम राबविण्यात येत आहे. पुढील दोन दिवसांत २० समित्या सखोल चौकशी करून अहवाल सादर करणार आहेत.
आळंदी परिसरात वारकरी विद्यार्थी वसतिगृहांमध्ये होणा-या बालकांच्या लैंगिक शोषणासंदर्भात महिला आयोगाने आळंदी पोलिस स्टेशनचा आढावा घेऊन वारकरी शिक्षण संस्थांची पाहणी केली आहे. अनधिकृत व नियमावलीचे पालन न करणा-या वारकरी शिक्षण संस्थांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश रूपाली चाकणकर यांनी दिले आहेत.
२० समित्या स्थापन
जिल्हाधिकारी, पुणे यांनी ३ सदस्यांचा सहभाग असलेल्या २० समित्या स्थापन केल्या आहेत. आज आणि उद्या शिक्षण संस्था, वसतिगृहे यांची सखोल तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश समितींना दिले आहेत. समिती ८ फेब्रुवारी रोजी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, पुणे यांना आपला अहवाल सादर करणार आहे.
वारकरी शिक्षण संस्थांमध्ये गैरप्रकार
महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर समिती स्थापन झाल्यानंतर म्हणाल्या की, वारक-यांचे श्रद्धास्थान असलेल्या आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्थांमध्ये गैरप्रकार सुरू आहेत. मुलांचे लैंगिक शोषण होत असल्याच्या तक्रारीची दखल घेऊन चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत. काही प्रकरणांत गुन्हे दाखल झाले आहेत, त्या प्रकरणांचा पोलिस तपास करत आहेत. यापुढे लैंगिक शोषण प्रकरणात कठोर कारवाईसाठी समितीकडून अनधिकृत संस्थांचा सखोल तपास होणार आहे.