मुंबई : सगळ्यांचे फोन सर्वेलन्सवर टाकले आहेत. ग्रुपवर तुम्ही कोणाशी काय बोलता, संवाद होतो यावर लक्ष आहे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेयांच्या या विधानामुळे दिवाळीत नंतर बॉम्ब फुटला असून आता त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. याच मुद्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर व राज्यातील सरकारवर टीकास्त्र सोडले. हे राष्ट्रद्रोही कृत्य आहे, अजित पवार, शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, मी, यांच्यासह अनेक लोक या रडारवर आहेत असे म्हणतानाच राऊत यांनी आणखी एक खळबळजनक आरोप केला.
देशाचे गृहमंत्री, अमित शहा हे फडणवीसांच्या विरोधात आहेत, त्यामुळे शहा यांचाही फोन टॅप होत असेल असा आरोप करत या लोकांचा काही भारोसा नाही अशी खोचक टीका राऊत यांनी केली. आम्ही फोन टॅप करतोय हे, चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे स्पष्ट शब्दांत मान्य केले आहे. याआधी २०१९ साली आमचे सरकार येत असताना हे प्रकार उघड झाले. सरकारने गुन्हे दाखल केले. देवेंद्र फडणवीस आणि राज्याच्या तेव्हाच्या पोलिस महासंचालक या सूत्रधार होत्या, गुन्हे दाखल झाले.
(टॅपिंगचा) हा अटकेचा आणि कठोर शिक्षा देण्याचा गुन्हा आहे. म्हणून तर त्यांना सारखी भीती वाटत होती की मला पकडले जाईल. ते जे बोलत होतेो ना मला अटक केली जाईल, हीच भीती होती. आता हा गुन्हा गंभीर आहे असे जर देवेंद्र फडणवीस, गृहमंत्र्यांना वाटत असेल तर त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना तत्काळ बरखास्त करून, गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे. विरोधी पक्षांचे, स्वत:च्या कार्यकर्त्यांचे, सहकारी पक्षांच्या लोकांचे फोन टॅप करणे हा कायदेशीर गुन्हा आहे आणि त्यासाठी कायद्यामध्ये कठोर तरतूद घटनेने केली आहे.
तेव्हाही फोन टॅप होत होते
जर खुद्द महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सांगत असतील की आम्ही आजही फोन टॅप करतो म्हणजे, तेव्हाही (२०१९ साली) फोन टॅप होत होते, त्यावेळी आमचे बोलणे ऐकत जात होते असा आरोप राऊतांनी केला. या फोन टॅपिंगच्या रडारवर कोण कोण आहे, असा सवाल राऊत यांना विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी थेट उत्तर दिले, पत्रकारसुद्धा रडारवर आहेत. जे फडणवीस गटाचे लोक नाहीत ते रडावर आहे, मिंध्यांचे (शिंदे गट) बहुतेक लोक आहेत, माझ्या माहितीप्रमाणे, स्वत: अजित पवारही रडावर आहेत असा खळबळजनक आरोप राऊतांनी केला.
शरद पवार असोत, उद्धव ठाकरे, राज ठाकरे असतील, मी असेन, काँग्रेसची लोकं असतील, सर्वांवर व्हिजीलन्स चालू आहे. या महाराष्ट्रात कोणत्या प्रकारची सेन्सॉरशिप लावली आहे? हे फक्त आम्ही बोलत नाही आहोत, पण जर स्वत: राज्याचे महसूसल मंत्री ( फोन टॅपिंगबद्दल) हे सांगत असतील, देशाच्या गृहमंत्र्यांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली देखील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी मागणी राऊत यांनी केली. हा अतिशय गंभीर गुन्हा आहे, काय सांगाव ते अमित शह यांचेही फोन टॅप करत असतील, असा आरोपही राऊत यांनी केला. कारण अमित शहा हे फडणवीसांच्या विरोधात आहेत, त्यांचा काही भरोसा नाही. अशा प्रकारची यंत्रणा वापरली जात असेल तर ते अत्यंत राष्ट्रद्रोही कृत्य आहे अशा शब्दात राऊतांनी टीकास्त्र सोडले.

