धाराशिव : प्रतिनिधी
सात दिवसाच्या मंचकी निद्रेनंतर मंगळवारी दुपारी १२ वाजता कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी मंदिरात सिंहासनावर देवीच्या मूर्तीची गाभा-यात प्रतिष्ठापना करण्यात आली. आई राजा उदोऽऽ उदोऽऽ च्या जयघोषात महंत, पुजारी आणि मानक-यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर देवीची नित्योपचार पूजा व धार्मिक कार्यक्रम पार पडले. मंगळवारपासून देवीच्या शाकंभरी नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला असून नवरात्र काळात नित्योपचार पूजा, अलंकार महापूजा आणि रात्री छबिना पार पडणार आहे.
मंगळवारपासून १४ जानेवारीपर्यंत देवीचा शाकंभरी नवरात्रोत्सव आहे. दररोज नित्यनेमाने धार्मिक कार्यक्रम सुरू राहणार आहे. दरम्यान मंगळवारी पहाटे ३ वाजता कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीची निद्रा संपून सिंहासनावर चल मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली. त्यापूर्वी देवीचे सिंहासन आणि संपूर्ण मुख्य गाभारा गोमुख तिर्थाने धुवून घेण्यात आला. तुळजाभवानी देवीचा शाकंभरी नवरात्र महोत्सव हा धाकटा दसरा म्हणून प्रसिद्ध आहे.