भारतीय चित्रपटांच्या इतिहासात ‘मुघल-ए-आजम’ चित्रपटाला ऐतिहासिक स्थान आहे तसेच स्थान एकदिवसीय विश्व चषक स्पर्धेच्या इतिहासात भारताचा वेगवान गोलंदाज महंमद शमीने मिळवले आहे. न्यूझिलंडविरुध्दच्या सेमी फायनलमध्ये शमीने ५७ धावांत ७ बळी घेत भारताला फायनलमध्ये पोहोचवले. त्याच्या खतरनाक गोलंदाजीमुळे उपान्त्य सामना सेमीफायनल नव्हे तर ‘शमी फायनल’ ठरला. ‘शमी फायनल’ भारताने ७० धावांनी जिंकला.
भारताने मिळवलेल्या शानदार विजयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास संदेश पाठवून भारतीय संघाचे कौतुक केले. या संदेशात पंतप्रधानांनी शानदार वैयक्तिक कामगिरी करणा-या भारतीय खेळाडूंचे कौतुक तर केलेच परंतु महंमद शमीचा खास उल्लेख करत त्याचे अभिनंदन केले. साखळीतील सर्व नऊ सामने जिंकणा-या टीम इंडियाने उपान्त्य फेरीचा दहावा सामनाही जिंकून भीम पराक्रम केला. उपान्त्य फेरी जिंकूनही काही जणांनी आता भारत फायनल जिंकणार काय अशी चर्चा सुरू केली आहे.
अर्थात अशी चर्चा सुरू करणा-या चर्चाखोरांना टीम इंडिया फायनलमध्ये ‘दस का दम’ दाखवेल यात शंका नाही. या आधी किवीजनी तीन वेळा सेमी फायनलमध्ये भारताला पराभूत केले होते. त्यामुळे वानखेडेवर काय होणार याची चिंता होती. परंतु ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळूनी किंवा पुरूनी टाका’ या मानसिकतेनेच भारतीय संघ मैदानावर उतरला होता. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आघाडीवर राहून (लीडिंग फ्रॉम द फ्रन्ट)संघाचे नेतृत्व करतोय. त्याने नेहमीचा झपाटा दाखवताना २९ चेंडूत प्रत्येकी ४ चौकार व षटकारांसह ४७ धावा ठोकल्या आणि नंतच्या फलंदाजांना स्टेज तयार करून दिले. त्यावर प्रत्येकाने आपली अदाकारी सादर केली. यंदाच्या स्पर्धेत भारतीय संघाने जे दिमाखदार प्रदर्शन केले आहे त्याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येकजण स्वत:साठी न खेळता (सेल्फनेस) संघासाठी खेळतोय म्हणूनच शुबमन गिलच्या नावावर ६६ चेंडूत ८० तर श्रेयस अय्यरच्या नावावर ७० चेंडूत १०५ धावा दिसतात. ‘मॉर्निंग वॉक’ला जावे तसे श्रेयस अय्यर ८ षटकार खेचताना दिसतो. गिलच्या पायात गोळे आलेले दिसले नसते तर त्याचेही शतक झळकलेले दिसले असते. विराट कोहली हा भारतीय फलंदाजीचा ‘रॉक ऑफ जिब्राल्टर’ आहे. त्याच्या भोवतीच फलंदाजीचा सुरेख गोफ गुंफला जातो.
विराटने ५० वे विक्रमी शतक ठोकले. हे विक्रमी शतक पाहण्यासाठी त्याच्या आयडॉल, हिरो सचिन तेंडुलकर आणि हिरोईन तथा सहधर्मचरिणी अनुष्का स्पेशल बॉक्समध्ये बसले होते. शतक झळकल्यानंतर त्याने आपल्या हिरोला जी मानवंदना दिली त्यातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडले. ‘फॅलॅटिक फिट’ असलेल्या विराटच्या पायातही पेटके आले होते तरीही त्याने ज्या पध्दतीने आपली शतकी खेळी सजवली त्याला मानाचा मुजरा! पठ्ठ्याने ११३ चेंडूत ११७ धावा काढताना फक्त ९ चौकार आणि २ षटकार ठोकले. परंतु त्याने काढलेल्या ४९ एकेरी आणि १० दुहेरी धावांचे मोल लाख मोलाचे आहे. त्यातच त्याचा ‘फिटनेस’ दिसतो. कोहलीने दुस-या विकेटसाठी गिल आणि श्रेयसबरोबर २५६ धावांची भागीदारी केली त्यामुळे भारताचे ३९७ धावांचे भरजरी वस्त्र विणले गेले. अर्थात त्यात ७० चेंडूत १०५ धावा काढणा-या श्रेयस आणि २० चेंडूत ३९ धावा काढणा-या लोकेश राहुल या विणकरांचाही मोठा वाटा आहे.
३९८ धावांचा महाकाय पर्वत उभा असताना ३९ धावांत २ शिलेदार परतले तेव्हा हे पर्वतारोहण करणे किवीजना जमणार नाही असेच वाटले. पण कर्णधार विल्यम्सन आणि डॅरील मिचेलने जिद्द सोडली नाही, या जोडीने दुस-या विकेटसाठी १८१ धावांची भागीदारी केली तेव्हा भारतीय संघाला घाम फुटला होता. परंतु सीम गोलंदाजीचा सम्राट महंमद शमी नेहमीच संघाच्या मदतीला धाऊन आला आहे. त्याने विल्यम्सनला बाद केले आणि हा सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला. शमीने ५७ धावांत ७ बळी घेतल्यानेच भारतीय संघाला अंतिम फेरी गाठता आली. या सामन्यात पहिल्यांदाच भारतीय संघाला सहाव्या गोलंदाजाची उणीव भासली. अंतिम लढतीसाठी सूर्यकुमारला वगळून रविचंद्रन अश्विनला संधी देण्यासंबंधी विचार करावा लागेल. दुसरे म्हणजे भारतीय संघाला क्षेत्ररक्षणात सुधारणा करावी लागेल आणि वाईड चेंडूवरही नियंत्रण ठेवावे लागेल. सलाम शमी-ए- आजम!