पुणे : राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (नॅशनल बुक ट्रस्ट) वतीने १६ ते २४ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होणा-या ‘पुणे पुस्तक महोत्सवा’च्या निमित्ताने येत्या १४ डिसेंबरला ‘शांतता पुणेकर वाचत आहेत..’ हा उपक्रम होणार आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी पुण्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांनी वाचन करायचे आहे, अशा सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या उपक्रमात शहरातील हजारो विद्यार्थी, शिक्षक आणि प्राध्यापक सहभागी होणार आहेत.
पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे महानगरपालिका आणि शालेय शिक्षण विभाग यांनी एकत्र येऊन केले आहे. यामध्ये पुस्तक प्रदर्शनाबरोबर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चासत्रे, साहित्यिकांच्या मुलाखती, सृजनशीलतेला वाव देणारे आणि वाचन संस्कृतीचा विकास घडविणारे कार्यक्रम होणार आहेत.
या महोत्सवाच्या निमित्ताने गुरुवारी १४ डिसेंबरला दुपारी १२ ते १ या वेळेत ‘शांतता पुणेकर वाचत आहेत’ हा कार्यक्रम ऐतिहासिक ठरणार आहे. या उपक्रमात सर्व पुणेकर जिथे असतील, तेथे एक तास आपल्या आवडीच्या पुस्तकाचे वाचन करणार आहेत. या महोत्सवामध्ये शालेय विद्यार्थी सहभागी झाल्यास शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होण्यात मदत होणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडणार आहे.
‘शांतता पुणेकर वाचत आहेत..’ या उपक्रमात शालेय विद्यार्थ्यांप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, अभिमत विद्यापीठे, खासगी विद्यापीठे आणि संलग्न सर्व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे पुस्तक वाचायचे आहे.