22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्र४० वर्षांनी शरद पवार रायगडावर; पक्षाच्या तुतारी चिन्हाचे अनावरण

४० वर्षांनी शरद पवार रायगडावर; पक्षाच्या तुतारी चिन्हाचे अनावरण

रायगड : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने नवे नाव आणि चिन्ह बहाल केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला नुकतेच केंद्रीय निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिले आहे. पक्षाच्या या नवीन चिन्हाचे अनावरण शरद पवार गटाने रायगड किल्ल्यावर केले. यावेळी शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यासह पक्षातील सर्व ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी हजर होते.

रायगड किल्ल्यावर पक्षाच्या अनावरण चिन्हासाठी शरद पवार हे तब्बल ४० वर्षांनी किल्ल्यावर आले. आधी रोप-वे आणि मग पालखीतून शरद पवारांना किल्ल्यावर नेण्यात आले. त्याठिकाणी पोवाडे आणि सांस्कृतिक कार्यक्रमासह पक्षाच्या नव्या चिन्हाच्े अनावरण करण्यात आले. यावेळी शरद पवार म्हणाले की, सध्याचा संघर्ष हा वैचारिक संघर्ष आहे. या देशात अनेक राजे झाले, संस्थानिक झाले परंतु रयतेचा राजा एकच झाला. सध्या राज्यात अडचणी वाढतील अशी स्थिती आहे. शिवछत्रपतींचे राज्य सामान्यांची सेवा करणारे राज्य होते. आज महाराष्ट्राची स्थिती बदलायची असेल तर पुन्हा एकदा याठिकाणी जनतेचे राज्य येईल यासाठी प्रयत्न करायचे आहेत. निवडणूक आयोगाने रणशिंग फुंकायला तुतारी दिली आहे.

संघर्षातून प्रेरणा देणारी ही तुतारी आहे. तुमच्या संघर्षातून, त्यागातून यश मिळणार याची खात्री आहे. या ऐतिहासिक भूमीत आपण आलोय. या ठिकाणाहून प्रेरणा घेऊन जनतेची सेवा करूया असे त्यांनी म्हटले.
तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र किल्ल्यावर पक्षाच्या चिन्हाचे अनावरण होत आहे. ही तुतारी महाराष्ट्राच्या जनमानसात स्वाभिमानाचं प्रतीक बनली आहे. महाराष्ट्राच्या काळजातील तुतारी आता महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ललकारी होईल. शरद पवारांच्या नेतृत्वात प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकारी महाराष्ट्राचा स्वाभिमान कायम बुलंद राहण्यासाठी प्रयत्नशील राहील असे खासदार अमोल कोल्हे म्हणाले.

दरम्यान, तुतारी हे वाद्य आक्रमक सेना जेव्हा युद्धाला निघते तेव्हा वाजवले जाते आणि आपण जिंकल्यानंतर युद्धावरून जेव्हा परत येतो तेव्हादेखील तुतारी वाजवली जाते. निवडणुकीच्या युद्धात उतरत असताना ८४ वर्षांच्या आमच्या योद्धाला तुतारी हातात देऊन शुभ संकेत निवडणूक आयोगाने दिलेत. या लढाईत तुतारी वाजलेली आहे. विचारांची लढाई आम्ही जिंकू म्हणजे जिंकू असा विश्वास जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR