बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांची तात्काळ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीमध्येच शरद पवार यांना त्रास जाणवू लागला. त्यानंतर जागेवरच डॉक्टरांकडून शरद पवारांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर डॉक्टरांनी शरद पवारांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
शरद पवार यांचे वय ८३ झाले तरी ते सातत्याने दौरे करत असतात. सध्या ते दिवाळी सणामुळे बारामती येथील निवासस्थानी आहेत. दिवाळी सणाच्या मुहूर्तावर सर्व पवार कुटुंब एकत्र दिवाळी सण साजरा करतात. त्यासठी शरद पवार हे देखील बारामतीत दाखल झाले आहेत. पण आज अचानक विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीमध्येच शरद पवार यांना त्रास जाणवू लागला, त्यामुळे डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर डॉक्टरांनी पवारांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
बैठकीला अजित पवार अनुपस्थित
विद्या प्रतिष्ठान संस्थेची वार्षिक सर्वसाधारण बैठक बारामतीतील व्हीआयटीमध्ये पार पडली. या बैठकीला विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांनी हजेरी लावली. मात्र अजित पवार या बैठकीस आले नाहीत. या बैठकीला उपाध्यक्ष अशोक प्रभुणे, खासदार सुप्रिया सुळे, प्रताप पवार, योगेंद्र पवार, सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य विश्वस्त उपस्थित आहेत. मात्र अजित पवार या बैठकीला उपस्थित नव्हते. सध्या ही बैठक विद्या प्रतिष्ठानच्या व्हीआयटीमध्ये झाली. दरम्यान, उद्या पुरंदर तालुक्यातील नीरा आणि सासवड येथे शरद पवारांचा शेतकरी भेटीचा कार्यक्रम होता. तो कार्यक्रम अपरिहार्य कारणामुळे पुढे ढकलण्यात आला आहे.