मुंबई : प्रतिनिधी
‘नवसाला पावणारा’ गणपती अशा प्रकारची ख्याती असलेल्या लालबागच्या राजाच्या चरणी लीन होण्यासाठी गेल्या दोन दिवसापासून अनेक दिग्गज हजेरी लावत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज (९ सप्टेंबर) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली नात रेवती सुळे आणि जावई सदानंद सुळे यांच्यासह ‘लालबागच्या राजा’चे दर्शन घेतले.
दरम्यान, आज सकाळी शरद पवार हे आपली नात आणि जावयासह ‘लालबागच्या राजा’च्या चरणी नतमस्तक झाले. यापूर्वी शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री असताना ते ‘लालबागच्या राजा’च्या दर्शनासाठी आले होते.
त्यानंतर कोरोना काळात लालबागच्या राजाची मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली नव्हती, तेव्हा मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाला शरद पवारांनी हजेरी लावली होती. त्यामुळे ‘लालबागच्या राजा’चे दर्शन घेण्याची शरद पवारांची ही दुसरी वेळ आहे.