मुंबई : प्रतिनिधी
अयोध्येत २२ जानेवारी रोजी श्रीरामाच्या भव्य मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. हा भव्य, दिव्य आणि नयनरम्य सोहळा पाहण्याची प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे. मात्र, अयोध्येतील जागेअभावी खास निमंत्रितांनाच या सोहळ््यासाठी बोलावण्यात आले आहे. देशभरातील दिग्गज मंडळी, संत-महंतांना या सोहळ््यासाठी निमंत्रण पाठवण्यात आले. यात राज्यातील ८८९ जणांचा समावेश आहे. दरम्यान, व्हीआयपी आणि साधू-संतांना आमंत्रण दिले गेले असले तरी अद्याप शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना निमंत्रण मिळालेले नाही.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ््यासाठी ८८९ जणांना निमंत्रित करण्यात आले असून यामध्ये ५३४ विशेष निमंत्रित आहेत. यात उद्योग, क्रीडा, कला तसेच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा समावेश आहे तर महाराष्ट्रातील ३५५ साधू-संतांनाही अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ््यासाठी खास निमंत्रित करण्यात आले आहे. अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ््याची जोरदार तयारी सुरू आहे. येथे मोठ्या संख्येने भाविक दाखल होणार असल्याने प्रशासन आणि मंदिर ट्रस्टकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
राज्यात ८८९ जणांना निमंत्रण
विशेष निमंत्रित : ५३४
कोकण : ३९७
पश्चिम महाराष्ट्र : ८४
मराठवाडा (देवगिरी) : १७
विदर्भ : ३६
निमंत्रित साधू संत : ३५५
कोकण : ७४
पश्चिम महाराष्ट्र : १२४
मराठवाडा (देवगिरी) : ८०
विदर्भ : ७७
साडेतीनशे व्हीव्हीआयपींना निमंत्रण
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधींना निमंत्रण देण्यात आले आहे. पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना निमंत्रण पाठवण्यात आलेले नाही. त्याशिवाय शरद पवार यांना अजूनही निमंत्रण पोहचलेले नाही.