32.5 C
Latur
Sunday, May 26, 2024
Homeमहाराष्ट्रशरद पवारांची प्रकृती बिघडली; सर्व कार्यक्रम रद्द

शरद पवारांची प्रकृती बिघडली; सर्व कार्यक्रम रद्द

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार हे पायाला भिंगरी लावल्यागत निवडणूक प्रचारात फिरत होते. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यात त्यांनी महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा घेतल्या. या सभांसाठी हजारो किमींचा प्रवास त्यांनी गेल्या काही दिवसांत केला आहे. तर, प्रत्येक सभेत जाहीर भाषणही केली. आपल्या भाषणातून शरद पवारांनी केंद्रातील मोदी सरकावर हल्लाबोल केलाय. मात्र, या सभांच्या व दौऱ्यांच्या धावपळीचा ताण आल्याने त्यांची प्रकृती अस्वस्थ झाली आहे.

लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून शरद पवार बैठका आणि सभांच्या नियोजनात व्यस्त असल्याचं दिसून आलं. महाविकास आघाडीची मोट बांधताना अनेकदा बैठकांसाठी तेच केंद्रबिंदू राहिले आहेत. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांचे सलोख्याचे संबंध असल्याने काँग्रेसची समजूत घालण्याचं किंवा महाविकास आघाडीत सुवर्णमध्य साधण्याचं काम शरद पवारांनीच केलं आहे. त्यानंतर, लोकसभा निवडणुकांच्या उमेदवारांच्या प्रचारसाठी ते पहिल्या टप्प्यापासून कामाला लागल्याचं दिसून आलं. काही दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यात निलेश लंके यांच्या प्रचारासाठी आल्यानंतर त्यांनी आपला घसा बसल्याचे सांगितले होते. मात्र, तरीही प्रचारसभा घेत त्यांनी पुढेही अनेक ठिकाणी सभा केल्या आहेत. या निवडणूक दौऱ्यांचा व सभांचा ताण पडल्याने त्यांची प्रकृती अस्वस्थ होऊन त्यांना आरामाची गरज आहे. म्हणूनच, त्यांचे उद्याचे सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

शरदचंद्रजी पवार यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे उद्या ६ मे रोजीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. उद्या दिनांक ६ मे रोजी कात्रज येथील नियोजित सभाही रद्द करण्यात आली असून याची सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी नोंद घ्यावी, अशी माहिती पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संबंधित माहिती कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचंही सांगण्यात आलं आहे.

बारामतीच्या सभेतही कातर आवाज
दरम्यान, शरद पवार यांनी आज बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी सभा घेतली. मात्र, येथील सभेतही त्यांनी मोजून ४ ते ५ मिनिटांचच भाषण केलं. येथील सभेतून बोलतानाही त्यांचा आवाज कातर होत होता. घसा बसल्याने शब्द नीट फुटत नव्हते. तरीही लेकीसाठी बापाने सभा घेऊन बारामतीकरांना आवाहन केलं. त्यावेळी, बारामतीकरांनीही महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार.. शरद पवार.. अशी घोषणाबाजी केली. त्यानंतर, आता शरद पवारांचे उद्याचे सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR