22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरशरद पवार यांचे विधान म्हणजे निवृत्तीचा इशारा की इमोशनल कार्ड!

शरद पवार यांचे विधान म्हणजे निवृत्तीचा इशारा की इमोशनल कार्ड!

लातूर : निवडणूक डेस्क
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आगामी काळात कोणतीही निवडणूक लढवणार नाही, असे संकेत दिले. विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात येत असतानाच त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे नवी चर्चा सुरु झाली आहे. शरद पवार नेमकं काय म्हणाले आणि त्यांच्या वक्तव्याचा अर्थ काय? हे ध्यानात घे तितकेच महत्वाचे ठरते.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शरद पवार यांनी सांगितले की, माझ्या १४ निवडणुका झाल्या आहेत. राज्यसभेचा दीड वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. मी माझं काम करत राहीन. नव्या लोकांना समोर आणलं पाहिजे. मी सुरुवातीची ३० वर्ष बारामतीचं प्रतिनिधित्व केलं. त्यानंतर अजित पवारांनी ३० वर्ष इथं विकास केला. आता आगामी ३० वर्षांची मला व्यवस्था करायची आहे.

शरद पवार यांनी यापूर्वी लोकसभेची निवडणूक लढवली नव्हती. त्यानंतर ते आता राज्यसभा निवडणूक लढवणार नाहीत का? संसदीय राजकारणातून निवृत्त होणार का? ही चर्चा आता सुरु झाली आहे. अर्थात शरद पवार कोणतंही विधान सहज करत नाहीत. त्या विधानामागे त्यांचे निरनिराळे उद्देश असतात. त्याचे वेगवेगळे अर्थ असतात. शरद पवार यांचे ताजे वक्तव्य देखील त्याला अपवाद नाही.

सहानुभूती फॅक्टर
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर दुस-याच दिवशी शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे. पक्षाच्या पारंपारिक मतदारांमध्ये सहानुभूती निर्माण करणे हा त्याचा महत्त्वाचा उद्देश असू शकतो. शरद पवारांसाठी ही विधानसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. पक्षातील फुटीनंतर पहिल्यांदाच होणा-या या निवडणुकीत त्यांच्यासमोर घरातूनच मोठं आव्हान आहे. पक्षाच्या पारंपारिक मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी या वक्तव्याचा शरद पवार यांना फायदा होऊ शकतो.

आघाडी मजबूत करण्याचा प्रयत्न
राज्यात भाजपाच्या विरोधात महाविकास आघाडीची निर्मिती करण्याचं श्रेय शरद पवारांचं आहे. ही आघाडी राज्यात एकत्र विधानसभा निवडणूक लढवत आहे. या आघाडीतील तीन्ही पक्षांना बंडखोरीचा फटका बसला. विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपातही महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांमधील मतभेद समोर आले होते. काँग्रेसला जागावाटपात कमी जागा मिळाल्यानं राहुल गांधी यांनीही नाराजी व्यक्त केली होती. या मतभेदाचा फटका महाविकास आघाडीला बसू नये. आघाडीमधील सर्व पक्ष एकत्र आणण्यासाठी पवारांनी हे वक्तव्य केलं असावं असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

बारामतीची लढाई सॉफ्ट होणार
बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेतही पवार विरुद्ध पवार लढाई होत आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाचा विजय झाला. पण, आता विधानसभेत प्रत्यक्ष अजित पवारांशी सामना आहे. त्यामुळे ही लढाई सोपी नाही, याची शरद पवार यांना नक्की जाणीव असावी. बारामतीमध्ये होणा-या प्रतिष्ठेच्या लढाईत शरद पवारांच्या या वक्तव्याचा त्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR