जिंतूर : तुळजा भवानीचे उपपीठ म्हणून ओळख असलेले तालुक्यातील श्री क्षेत्र भोगाव-देवी येथे देवीसाहेब संस्थानच्या शारदीय नवरात्रोत्सवास गुरूवार, दि.३ ऑक्टोबर पासून घटस्थापनेने प्रारंभ झाला आहे.
विजयादशमी पर्यंतच्या या धार्मिक सोहळ्यानिमित्त मंदिरात रोज सकाळ, संध्याकाळ देवीची आरती, दुपारी ४ ते सायंकाळी ६ पर्यंत सप्तशती कथा वाचन, लघुरुद्र अभिषेक, सप्तशती पाठ, गणपती अथर्वशीर्ष पाठ, श्रीसुप्त पाठ, नवार्ण जप इत्यादी दैनंदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. दि.१० ऑक्टोबर पासून कुमारिका पूजन होऊन रात्री होम पुजा प्रारंभ होईल. दुसरे दिवशी दुपारी बारा नंतर पुणार्हुती व महाआरती होईल. संध्याकाळी ७ वाजता श्रीची पालखी सोहळा पार पडेल. दि.१२ ऑक्टोबर सकाळी नवरात्रोत्थापन, महाप्रसादाचा कार्यक्रम होऊन संध्याकाळी सिमोलंघनाने विजयादशमीला सोहळ्याची सांगता होईल.
देवी भक्तांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन देवीसाहेब संस्थानचे अध्यक्ष माजी आ. गुलाबचंद राठी, उपाध्यक्ष भगवानराव देशमुख, सचिव प्रल्हादराव देशमुख तथापि सर्व विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. महापूजा व होमहवन होईपर्यंत देवी मूतीर्चे दर्शन बंद असते. गाभा-यांच्या गवाक्षातून मुखदर्शन घ्यावे लागते.
जगदंबा अन्नछत्र मंडळामार्फत सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत भाविकांना प्रसादाची व्यवस्था केली जाते. मंदिराच्या आवारात स्त्री-पुरुष देवीभक्त ९ दिवस धरणे- पारणे करतात. वेगवेगळ्या कारणास्तव बाहेरगावी वास्तव्यास असलेले भोगावकर होम पुजेसाठी गावी परत येतात. जिंतूर-औंढा मार्गावर जिंतूरपासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या या संस्थान पर्यंत शहरातून भाविकांना येण्यासाठी बससेवा सुरू असते.