सोमनाथ : सोमनाथ मंदिराच्या स्वाभिमान पर्वामध्ये रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभाग घेतला. येथे १०८ अश्वांसह काढण्यात आलेल्या शौर्य यात्रेमध्ये ते सहभाही झाले होते. ही शौर्य यात्रा सोमनाथ मंदिराच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणा-या अगणित वीर योद्ध्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या उद्देशाने काढण्यात आली होती.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंदिरावर झालेल्या हल्ल्यांच्या उल्लेख करत मोठे विधान केले. गझनीपासून औरंगजेबापर्यंत अनेक आक्रमक इतिहासाच्या पानांमध्ये गडप झाले, पण सोमनाथ मंदिर तिथेच उभे आहे असे नरेंद्र मोदी म्हणाले.
शौर्यसभेला संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, एक हजार वर्षांपूर्वी १०२६ साली महमूद गझनी याने केलेल्या हल्ल्यावेळी इथे काय वातावरण असेल, आज इथे उपस्थित आहेत, त्यांच्या पूर्वजांनी, आमच्या पूर्वजांनी आपल्या आस्थेला वाचवण्यासाठी आपल्या महादेवांसाठी प्राणांची बाजी लावली होती. एक हजार वर्षांपूर्वी हे आक्रमक विचार करत होते की, त्यांनी आम्हाला जिंकले आहे. मात्र आज एक हजार वर्षांनंतरही सोमनाथ महादेव मंदिरावर फडकत असलेला ध्वज हिंदुस्तानची शक्ती काय आहे, त्याचे सामर्थ्य काय आहे हे संपूर्ण सृष्टीला दाखवून देत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले की, जेव्हा गझनीपासून औरंगजेबापर्यंत सर्व आक्रमक सोमनाथ मंदिरावर हल्ले करत होते. तेव्हा त्यांना वाटत होते की, त्यांची तलवार सनातन सोमनाथवर विजय मिळवत आहे. मात्र ज्या सोमनाथला ते नष्ट करू इच्छित होते, त्याच्या नावामध्येच सोम अर्थात अमृत आहे, हे धर्मांध कट्टरपंथी समजू शकले नाहीत. त्याच्यामध्ये हलाहल प्राशन करून अमर राहण्याचा विचार जोडलेला आहे. तसेच त्यामध्ये सदाशिव महादेवांच्या रूपात चैतन्यशक्ती प्रतिष्ठित आहे. ती कल्याणकारक आहे आणि प्रचंड तांडव: शिव: हा शक्तीचा स्रोहती आहे. त्यामुळेच गझनीपासून औरंगजेबापर्यंत सोमनाथवर हल्ला करणारे सर्व आक्रमक इतिहासाच्या पानांमध्ये गडप झाले. मात्र चिरंतन सोमनाथ मंदिर सागर किना-यावर अभिमानाने उभे आहे असेही नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

