मेरठ : मेरठमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीची हत्या केल्यानंतर पत्नीने स्वत:ला वाचवण्यासाठी मुस्कान आणि साहिलसारखा भयानक कट रचला. मात्र यावेळी निळ्या ड्रमऐवजी, एका सर्पमित्राकडून साप विकत घेण्यात आला. पतीची हत्या केल्यानंतर पत्नी रविता हिने नव-याच्या बेडवर साप सोडला. नंतर असा दावा करण्यात आला की, तरुण झोपेत असताना त्याला १० वेळा साप चावला आणि त्याचा मृत्यू झाला. पण पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये सत्य बाहेर आले.
अमित मेरठच्या बहसुमा पोलिस स्टेशन परिसरातील अकबरपूर सादात गावचा रहिवासी होता. तो बेडवर झोपला आणि सकाळी त्याचा मृतदेह आढळला, त्यासोबत बेडवर एक जिवंत सापही दिसला. लोकांना वाटले की, अमितला साप चावला त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. गावात एकच खळबळ उडाली. याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये बेडवर एक साप बसलेला स्पष्ट दिसत आहे.
सुनियोजित हत्या असल्याचे उघड
जेव्हा अमितचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आला तेव्हा त्यातून अतिशय धक्कादायक गोष्ट समोर आली. डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले की, अमितचा मृत्यू साप चावल्याने झाला नव्हता तर गळा दाबल्याने झाला होता. हे ऐकून पोलिस सावध झाले. तपास लगेच सुरू झाला. ही एक सुनियोजित हत्या असल्याचे उघड झाले. पोलिसांनी तपास केला तेव्हा संशयाची सुई थेट अमितची पत्नी रविता हिच्याकडे गेली.
पत्नीचे दुस-या तरुणावर प्रेम
पोलिसांनी रविताची कसून चौकशी सुरू केली. तसेच गावातील आणखी दोन तरुणांनाही ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान ज्या गोष्टी समोर आल्या त्या एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नव्हत्या. रविताचे तिच्याच गावातील एका तरुणाशी अवैध संबंध होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू होते आणि अमित या नात्यात अडथळा बनला होता. म्हणून रविता आणि तिच्या प्रियकराने मिळून अमितला संपवण्याचा कट रचला.
पोस्टमॉर्टेम रिपोर्टने पत्नीचा पर्दाफाश
हत्या केल्याचे समजायला नको म्हणून रविता आणि तिच्या प्रियकराने बाजारातून एक जिवंत साप विकत घेतला आणि त्याच्या मृतदेहाखाली तो साप ठेवण्यात आला जेणेकरून असे दिसून येईल की त्याचा मृत्यू साप चावल्याने झाला आहे. एवढेच नाही तर ही घटना खरी असल्याचे दाखवण्यासाठी व्हीडीओ बनवण्यात आले आणि सोशल मीडियावर व्हायरलही करण्यात आले. पण पोस्टमॉर्टेम रिपोर्टने पत्नीचा पर्दाफाश केला. पोलिसांनी रविता आणि तिच्या प्रियकराला अटक केली. चौकशीदरम्यान दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला आहे.