मुंबई : शिखर बँक घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मोठ्या नेत्यांना याप्रकरणी दिलासा मिळाला आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी दुस-यांदा क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार रोहित पवार यांचीदेखील याच प्रकरणी ईडी चौकशी सुरु आहे. अजित पवार यांच्यासह अमरसिंह पंडित, माणिकराव कोकाटे, शेखर निकम या नेत्यांना दिलासा मिळाला आहे.
शिखर बँक घोटाळा प्रकरणी महाविकास आघाडी सरकारच्या काळात पहिला क्लोजर रिपोर्ट सादर झाला होता. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आल्यानंतर याप्रकरणी पुन्हा तपास सुरु करण्यात आला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी कोर्टात आज पुन्हा याप्रकरणी दुसरा क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे.
जवळपास १५ ते २० वर्षांपूर्वी शिखर बँकेनं २३ सहकारी साखर कारखान्यांना कर्ज दिलं होतं. ते कारखाने तोट्यात गेल्यानं ती कर्ज बुडीत खात्यात गेली. मात्र तेच कारखाने नंतर काही नेत्यांनी खरेदी केले आणि पुन्हा त्याच कारखान्यांना शिखर बँकेनंच कर्ज दिल्याचा आरोप झाला. या सा-यात शिखर बँकेला २ हजार ६१ कोटींचा फटका बसल्याचा आरोप करण्यात आला होता. विशेष म्हणजे सिंचन आणि शिखर बँकेवरुन सत्ताधारी भाजपनंच अनेकदा आरोप केले होते. त्याच प्रकरणात आता सत्तेत असलेल्या अजित पवार यांच्यासह अमरसिंह पंडित, माणिकराव कोकाटे, शेखर निकम या नेत्यांना दिलासा मिळाला आहे.