रायगड : महापालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेने काँग्रेसशी हातमिळवणी केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदेंवर तिखट हल्ला चढवला आहे. शिवसेनेने काँग्रेसशी युती करून बाळासाहेबांचे विचार खुंटीऐवजी समुद्रात डुबवल्याचे म्हटले जात आहे.
राज्यात महापालिका निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर स्थानिक पातळीवर वेगवेगळी समीकरणे अस्तित्वात येत आहेत. त्यात एकमेकांचे घोर विरोधकही एकत्र येण्याच्या घटना घडत आहेत. त्यात सत्ताधारी शिंदे गटानेही काँग्रेसशी युती करून आपला वेगळा मार्ग निवडला आहे. एकनाथ शिंदे व त्यांच्या सहका-यांनी काँग्रेससोबत गेल्याच्या मुद्यावरून उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती. पण आता त्यांनीच काँग्रेसशी हातमिळवणी केल्यामुळे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटाचा समाचार घेतला आहे.
शिंदेंची अंतुलेना साथ, बाण-पंजा एक साथ
धारशिवच्या उमरगा नंतर सादर आहे शिंदे-काँग्रेस युतीचे नवे पर्व, ‘द मुरुड फाईल्स’. शिंदेंची अंतुलेना साथ, बाण-पंजा एक साथ. यंदा ‘बाळासाहेबांचे विचार’ खुंटीऐवजी थेट समुद्रात का मग? असा सवाल अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे. या प्रकरणी त्यांनी रायगड जिल्ह्यातील मुरूड येथे शिवसेनेने काँग्रेससोबत युती झाल्याचा एक फोटोही शेअर केला आहे. त्यात काँग्रेस नेते बॅरिस्टर अंतुले यांचा फोटो बाळासाहेब ठाकरे यांच्या शेजारी असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय धनुष्यबाण व पंजा या दोन्ही पक्षांच्या निवडणूक चिन्हासह ‘आता मुरुडच्या विकासाला शिवसेना व काँग्रेसची साथ’ अशी टॅगलाईनही या पोस्टरवर दिसून येत आहे.
दानवेंची टीका ही प्रसिद्धीसाठी : शिंदे गट
शिंदे गटाचे रायगडचे उपजिल्हाप्रमुख उद्धव कुथे यांनी अंबादास दानवेंवर सवंग प्रसिद्धीच्या लोभापायी शिवसेनेवर टीका केल्याचा आरोप केला आहे. एकनाथ शिंदे व त्यांचे शिलेदार योग्य पद्धतीने बाळासाहेबांचे विचार घेऊन वाटचाल करत आहेत. तुम्ही जिथे राहता तिथे एक ग्रामपंचायत सदस्य निवडून आणून दाखवा. तुम्ही केवळ प्रसिद्धीसाठी अशी टीका करतात. तुम्ही शिंदेंवर बोलला नाहीत, तर एकही दिवस उजेडात येऊ शकत नाही. शिंदे हे महाराष्ट्राचे वाघ आहेत. तर तुम्हाला जनतेने घरी बसवले आहे. त्यामुळे तुम्ही घरीच बसा, असे त्यांनी म्हटले आहे.
हा संविधानद्रोह हे सूर्यप्रकाशाएवढे स्वच्छ
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार तथा विधानपरिषदेतील माजी विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणी सरकारवर संविधानद्रोह केल्याचा आरोप केला आहे. कायद्यासमोर सर्व समान आहेत, हे जर या सरकारला मान्य असेल तर सरकारने माणिकराव कोकाटे यांचा तातडीने राजीनामा घ्यायला हवा. सरकारने यापूर्वी जो न्याय राहुल गांधी यांच्या खासदारकी आणि सुनील केदार यांच्या आमदारकीसाठी लावला, तोच न्याय माणिकराव कोकाटे यांना लागू व्हायला हवा. सरकार निर्लज्जपणे हायकोर्टाच्य कामकाजाची वाट पाहत असेल तर हा संविधान द्रोह आहे, हे सूर्यप्रकाशाप्रमाणे स्वछ आहे, असे दानवे म्हणालेत.

